पुणे : ‘कला ही समाजाला आकार देत असते, तर कलाकार विचार देत असतो. कलाकृती माणसाला हसवते, रडवते. मात्र, ती माणसातील माणूसपण घडवत असते. त्यामुळे कलेतून मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेश देणे गरजेचे असते. त्यातच त्या कलाकृतीचे वेगळेपण अधोरेखित होते,’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी रविवारी व्यक्त केले.
आडकर फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळलिखित ‘द्रौपदी काल…आज…उद्या’ या कादंबरीचे प्रकाशन वैशाली माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी डाॅ. माशेलकर बोलत होते. संजीवनी समेळ, अंमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, अभिनेते संग्राम समेळ, प्रमोद आडकर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संजीवनी समेळ, श्रद्धा समेळ आणि संग्राम समेळ यांनी या कादंबरीतील काही प्रसंगांचे अभिवाचन केले.
‘नाटक म्हणजे केवळ रंगमंच नसतो. तो समाजाचा आरसा आहे. त्यात समाजातील अनेक घटना-घडामोडींचे प्रतिबिंब उमटत असते. समाजातील बदलांना टिपत असतो,’ असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले.
आजच्या युवकांना तत्काळ यश हवे असते. मात्र, तत्काळ यश असा काही प्रकार नसतो. यश मिळवण्यासाठी कष्टाला पर्याय नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते,’ असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. माशेलकर म्हणाले, ‘महाभारतातील द्रौपदी ही स्त्रीच्या सामर्थ्याची आणि धैर्याची जिवंत प्रतिमा आहे. ती स्वयंभू, स्थितप्रज्ञ, कुशल, बुद्धिमान, प्रगल्भ, सहनशील आहे. आजची द्रौपदी ही सर्व क्षेत्रात मुक्तपणे वावरत आहे. ती राष्ट्रपती भवनात आहे. अंतराळ, रणांगण अशा सर्व ठिकाणी तिचे अस्तित्व उठून दिसते. ही द्रौपदी अन्यायाकडून न्यायाकडे आणि दुर्बलतेकडून सबलतेकडे जाणारी आहे. तिला सन्मान द्यायला हवा, तेव्हाच उद्याची द्रौपदी घडवण्यासाठी प्रयत्न करता येतील.’
‘महाभारत आणि रामायणातून समाजाला जगण्याची मूल्ये सांगितली आहेत. महाभारतातील द्रौपदीचा म्हणजेच एका स्त्रीशक्तीचा विलोभनीय प्रवास या कादंबरीतून साकारला आहे,’ असे डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.
‘महाभारत घडविणारी स्त्रीशक्ती म्हणजेच अग्निशिखा हिच्याविषयी लिखाण करावे या हेतूने या कादंबरीची निर्मिती केली. महाभारताच्या आधीची द्रौपदी, वस्त्रहरणानंतर पांडवांचे षंढत्व नाकारणारी द्रौपदी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांना चेतवत राहिलेली द्रौपदी ही समाजात पतीव्रता म्हणून ओळखली जाते. तिच्यातील अनेक गुण आजच्या स्त्रीयांमध्ये देखील आहेत या विषयीही या कादंबरीत भाष्य केले आहे,’ असे लेखक अशोक समेळ यांनी सांगितले.
मैथली आडकर यांनी स्वागत केले. शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.