scorecardresearch

पुणे : शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य करणारा क्रीडा शिक्षक गजाआड, समुपदेशनातून उघड झाला प्रकार

या प्रकरणी अविनाश गोविंद चिलवेरी (वय २३, रा. विडी कामगार वसाहत, गोल्फ क्लब रस्ता, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे.

sports teacher sexually abuse girls
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य करणारा क्रीडा शिक्षक गजाआड (संग्रहित छायाचित्र)

शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य करणाऱ्या महापालिकेच्या शाळेतील क्रीडा शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी अविनाश गोविंद चिलवेरी (वय २३, रा. विडी कामगार वसाहत, गोल्फ क्लब रस्ता, येरवडा) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिलवेरी याच्या विरुद्ध विनयभंग, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा भागात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत चिलवेरी क्रीडा शिक्षक आहे. त्याने शाळेतील चार ते पाच विद्यार्थिनींना समाजमाध्यमातून संदेश पाठविले. त्यांच्याशी अश्लील कृत्य केले.

हेही वाचा – पुणे : श्वान आडवे आल्याने दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू, वाडिया महाविद्यालय परिसरातील अपघात

हेही वाचा – पुणे : दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आणखी काही जण सामील? आरोपींनी वापरलेली दोन वाहने जप्त

दरम्यान, शाळेत एका स्वयंसेवी संस्थेकडून विद्यार्थिनींच्या समुपदेशनासाठी नुकताच एक कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शाळकरी मुलींना चांगला स्पर्श, तसेच वाईट स्पर्शाबाबतची (गुड टच, बॅड टच) माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलींनी चिलवेरीने अश्लील कृत्य केल्याची माहिती समुपदेशकांना दिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. चिलवेरीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 14:46 IST