आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही विषयावर विचार मांडण्याची संधी देणारी ‘सृजन वाक् यज्ञ २०१५’ ही वक्तृत्व स्पर्धा यंदा किमान एक हजार स्पर्धकांना संधी देत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी उत्सुक झाली आहे. ‘वक्ता दशसहस्रेषू’ असे म्हणताना या स्पर्धेत विविध वयोगटांतील एक सहस्र स्पर्धक सहभागी व्हावेत यासाठी संयोजकांनी कंबर कसली आहे.
एच. व्ही. देसाई महाविद्यालयातर्फे वास्तुशोध फाऊंडेशन आणि दिशा डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष असून, या वर्षी हा सृजन वाक् यज्ञ १५ फेब्रुवारी रोजी एच. व्ही. देसाई महाविद्यालय येथे दुपारी दोन ते सायंकाळी सहा या वेळात होणार आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धेत ८०० स्पर्धक सहभागी झाले होते. यंदाच्या स्पर्धेत ही संख्या किमान एक हजार व्हावी आणि या अभिनव स्पर्धेची नोंद गिनिज बुकमध्ये केली जावी यासाठी संयोजकांचा प्रयत्न राहणार आहे.
इयत्ता पाचवी ते नववीपर्यंत अशा शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांपासून ते कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय, पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. विद्यार्थ्यांसह सर्व स्पर्धकांना आपल्या आवडीच्या विषयावर बोलायचे आहे. भाषणाचा कालावधी चार मिनिटांचा आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थिसंख्येचे बंधन नाही. ही स्पर्धा संपल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता बक्षीस समारंभ होणार आहे, अशी माहिती प्रा. गणेश राऊत यांनी दिली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७ फेब्रुवारी ही नावनोंदणीची अंतिम मुदत आहे. इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणीसाठी वासंती कुलकर्णी (मो. क्र. ७७९८७७४३२१) किंवा अमेय साठे (मो. क्र. ८३०८००६५५३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jan 2015 रोजी प्रकाशित
‘सृजन वाक् यज्ञ’ वक्तृत्व स्पर्धा ‘गिनिज बुक’मधील नोंदीसाठी उत्सुक
आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही विषयावर विचार मांडण्याची संधी देणारी ‘सृजन वाक् यज्ञ २०१५’ ही वक्तृत्व स्पर्धा यंदा किमान एक हजार स्पर्धकांना संधी देत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी उत्सुक झाली आहे.
First published on: 30-01-2015 at 02:36 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srujan walk yadnya orator competition eager for register of gines book