पुणे: पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पीएमपीएमएल बस, रिक्षा आणि मोटारी यांच्या स्वतंत्र मार्गिका तयार केल्या जाणार आहेत. स्थानकाच्या आवारातील आणि बाहेरील कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार या उपाययोजना केल्या जाणार आहेत. पुणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवाशांना सोडण्यास येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी स्थानकाच्या आवारात होते. यामुळे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर अनेक वेळा कोंडी होते. बाहेरील रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना या कोंडीचा मोठा त्रास होता. याचबरोबर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही अनेक वेळा आपत्कालीन प्रसंगी तेथून पुढे जाता येत नाही. त्यामुळे रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) ही कोंडी कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. पुढील काळात रेल्वे स्थानकात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या मार्गिका असतील. या मार्गिका पीएमपी बस, रिक्षा आणि मोटारींसाठी असतील. अनेक वेळा मोटारी आणि रिक्षा या स्थानकाच्या आवारात कशाही उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. स्वतंत्र मार्गिका केल्यानंतर कोंडी कमी होण्यास मदत होईल. पुढील काही दिवसांत रेल्वेकडून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. जुनीच व्यवस्था पुन्हा नव्याने रेल्वेने आधी वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या मार्गिका केल्या होत्या. या मार्गिकांमुळे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. याबाबत वारंवार तक्रारी येऊ लागल्याने स्वतंत्र मार्गिका बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. आता पुन्हा स्वतंत्र मार्गिका करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेत आहे. यामुळे कोंडी सुटणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.