प्रथमेश गोडबोले

पुणे : आकुर्डी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे (हवेली क्रमांक २४) सह दुय्यम निबंधक एस. पी. भातंबरेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. खरेदीखताच्या दस्तात तब्बल २४ कोटी ९० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी आकारल्याचा ठपका ठेवत भातंबरेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांनी प्रसृत केले. या कार्यालयाला गुरुवारी (१२ ऑक्टोबर) पुणे शहरचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी अचानक भेट दिली. तसेच हिंगाणे यांच्या कार्यालयातील तपासणी पथकाकडून हवेली क्र. २४ या कार्यालयात चालू वर्षातील सप्टेंबर आणि ११ ऑक्टोबरपर्यंत नोंदविम्यात आलेल्या दस्तांची स्वैरपद्धतीने (रॅण्डम) तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत भातंबरेकर यांनी ११ सप्टेंबर रोजी नोंदविलेल्या एका खरेदीखताच्या दस्तात २४ कोटी ९० लाख १५ हजार ८०० रुपयांच्या मुद्रांक शुल्काची कमी आकारणी केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी ही बाब १७ ऑक्टोबरला राज्य शासनाला कळविली.

आणखी वाचा-देशातून मोसमी वारे माघारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानुसार भातंबरेकर यांनी खरेदीखताच्या दस्तात योग्य मुद्रांक शुल्क न आकारल्याने शासनाचा महसूल बुडाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भातंबरेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. १९ ऑक्टोबरपासून पुढील आदेश प्रसृत करेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश अंमलात असेपर्यंत भातंबरेकर यांचे मुख्यालय मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली राहणार आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.