OBC Protest पुणे : मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मराठा आरक्षण उपसमितीने चर्चा करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र त्याचा तपशील पाहिला तर प्रत्येकाच्या मनात शंका निर्माण असू शकतात. मराठा समाजाच्या मनातील शंका राज्य सरकारने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसींच्या मनातील शंकाही राज्य शासनाने दूर केल्या पाहिजेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केले.
शहरातील मानाच्या गणपतींबरोबरच प्रमुख गणेश सार्वजनिक गणपती मंडळांना भेट देऊन दर्शन घेतले. शहराध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासकीय अध्यादेश काढण्यात आला आहे. मात्र हा अध्यादेश असंविधानिक असल्याचा आरोप ओबीसी समाजाकडून होत आहे. ओबीसींच्या आरक्षणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने ओबीसी समाजामध्ये नाराजी आहे, यासंदर्भात तटकरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय महायुतीने सरकारने घेतला आहे. या निर्णयात श्रेयवाद नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीने एकत्रित चर्चा करूनच हा निर्णय घेतला आहे.’
महायुती सरकारने अध्यादेशाद्वारे मराठा समाजाच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयाचा आपल्या आरक्षणावर काय परिणाम होणार, अशी शंका अन्य मागासवर्गीयांना (ओबीसी) असेल, तर ते अभ्यासानंतरच कळू शकेल. त्यांना या बाबत काही शंका असतील,तर त्या दूर करणे शासनाचे कर्तव्य आहे. त्यानंतरही काही प्रश्न असतील, तर लोकशाहीने प्रत्येकाला म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य आहे,’असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘आरक्षणासाठी सकल मराठा समाजाने शांततेने दीर्घकाळ लढा दिला आहे. महायुतीचे सरकार सर्वांना सोबत घेऊन जाणारे सरकार आहे. मात्र, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे, हीच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असून आम्ही त्यावर ठाम आहोत.