पुणे : ‘महाराष्ट्रातील जनतेने विश्वासाने महायुती सरकारला प्रचंड बहुमत दिले. मात्र, देशपातळीवर राज्याची प्रतिमा डागाळली आहे. राज्यात दीडशे वर्षांत जे घडले नाही, ते १५० दिवसांत घडले आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती बिघडली असून, गुन्हेगारी, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार, वाहतूककोंडी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी महायुती सरकारवर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मित्र पक्षांवर नाराज असून, महाराष्ट्राची अब्रू वाचविण्याची वेळ आली असल्याचेही त्या म्हणाल्या.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके आणि पदाधिकारी उपस्थित होते. सुळे म्हणाल्या, ‘बीडमधील सरपंच हत्या प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, लाडकी बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार, अधिवेशनादरम्यान सभागृहात कृषिमंत्री मोबाइलवर रमी खेळत असल्याचे चित्रीकरण, समाजकल्याण मंत्री खासगी हाॅटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन बसल्याचे प्रकरण, मंत्र्यांची बेताल वक्तव्ये, सरकारच्या थकीत देयकांमुळे कंत्रादाराची आत्महत्या यांंसारख्या घटना घडल्या आहेत. राज्याची देशपातळीवर बदनामी झाली आहे.’
‘बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या, महादेव मुंडे यांची हत्या या प्रकरणांमागे कोण आहे, हे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी समोर आणले. त्यातून अनेक दुर्दैवी घटना उघडकीस आल्या. घरे, संसार उद्ध्वस्त झाल्याचेही उघड झाले. असे असताना सरकार या प्रकरणांच्या पाठीमागे असणाऱ्यांना ‘क्लीन चीट’ देत आहे, ही अत्यंत शरमेची बाब आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे चित्रीकरण समाजमाध्यमावर आले तेव्हाच त्यांनी राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, नैतिकता न दाखवता मुख्यमंत्री दिल्लीच्या ‘हायकमांड’ला सांगतात. प्रत्येक वेळी दिल्लीत सांगण्याची वेळ का येते,’ असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
‘दिशा समितीची स्थापना नाही’
‘केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांची, योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामांसाठी ‘जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती’ची (दिशा) स्थापना महत्त्वाची असते. मात्र, नवीन सरकार सत्तेत आल्यापासून अद्याप ‘दिशा’ समितीची स्थापना झालेली नाही. याबाबत अनेकदा सरकारला निवेदन दिले आहे,’ असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.