आंबेबहारात मोसंबीचा गोडवा!

यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला असून आंबेबहारातील मोसंबीचा गोडवा येत्या काही दिवसांत वाढणार आहे.

मार्केट यार्डमध्ये आवक सुरू

पुणे : आंबट-गोड रसाळ मोसंबीचा आंबेबहार सुरू झाला असून मार्केट यार्डातील फळबाजारात औरंगाबाद परिसरातून दररोज ४० ते ५० टन एवढी मोसंबीची आवक होत आहे. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला असून आंबेबहारातील मोसंबीचा गोडवा येत्या काही दिवसांत वाढणार आहे.

मोसंबीचे तीन बहार असतात. आंबेबहार, मृगबहार आणि अडकन बहार हे तीन हंगाम असून दर्जेदार मोसंबीची आवक आंबेबहारात होते. पावसाळ्यात आंबेबहार सुरू होतो. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात औरंगाबाद, पैठण, पिंपरी राजा, अडुळ, बालानगर भागातून दररोज ४० ते ५० टन मोसंबीची आवक होत आहे. एका टेम्पोतून साधारणपणे चार टन मोसंबीची आवक होते. सध्या बाजारात दररोज १२ ते १५ टेम्पोतून मोसंबीची आवक होत आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने आंबेबहारातील मोसंबीची प्रतवारीही चांगली आहे, असे मार्केट यार्डातील मोसंबी व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंबेबहारातील मोसंबीची आवक वाढणार असून हंगामातील पहिल्या टप्यात मोसंबीची चव आंबट-गोड राहणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात मोसंबीचा गोडवा आणखी वाढेल. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंबेबहारातील मोसंबीची प्रतवारी चांगली राहणार आहे तसेच मोसंबीचे दरही कमी राहतील, असे त्यांनी सांगितले.

सध्या किरकोळ बाजारात एक किलो मोसंबीची विक्री प्रतवारीनुसार २० ते ४० रुपये दराने केली जात आहे. साधारणपणे एका किलोत चार ते पाच फळे बसतात. घाऊक बाजारात तीन डझन मोसंबीचे  दर १०० ते २०० रुपये दरम्यान आहेत. लहान आकाराच्या चार डझनची मोसंबीला ३० ते ८० रुपये दर मिळाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारातून सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील हुबळी, धारवाड परिसरात मोसंबी विक्रीस पाठविली जात आहे, असे ढमढेरे यांनी नमूद केले.

आंबेबहार म्हणजे काय?

मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंब्यांच्या हंगामाची अखेर होते. त्यानंतर जुलै महिन्यात मोसंबीचा बहार सुरू होतो. आंब्यांच्या हंगामानंतर बाजारात आवक होणाऱ्या मोसंबीला आंबेबहारातील मोसंबी म्हणतात. या कालावधीत पाऊस चांगला झाल्याने मोसंबीची प्रतवारी आणि गोडीही चांगले असते. फेब्रुवारी महिन्यापर्यंत आंबेबहारातील मोसंबीची आवक सुरू असते. त्याला जुना बहार असेही म्हटले जाते. त्यानंतर फेब्रुवारी ते जून महिन्यापर्यंत मोसंबीचा मृगबहार सुरू असतो. जून ते जुलै दरम्यान मधोमध आवक होणारी मोसंबी अडकन बहारातील असते. संपूर्ण देशभरात मोसंबीची सर्वाधिक लागवड नगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर होते, असे मार्केट यार्डातील मोसंबी व्यापारी सोनू ढमढेरे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sweet lime season begins arrives in pune market yard zws

ताज्या बातम्या