पुणे : सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्रामपातळीवरील नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होतील, तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील, असा दावा करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाचे सह सचिव ज्ञानदेव सुळ यांनी हा शासकीय निर्णय जारी केला आहे.
ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी हे महसूल विभागातील महत्त्वाचे पद आहे. तलाठ्यांचा संपर्क थेट जनतेशी असतो. मात्र, अनेक तलाठी रोज कार्यालयात उपस्थित राहत नाही. तसेच उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या व्यस्ततेमुळे तलाठी यांच्यावर प्रभावीपणे पर्यवेक्षण करणे शक्य होत नाही. मनुष्यबळ उपलब्ध असूनही समन्वयाच्या अभावामुळे दैनंदिन कामकाज परिणामकारक होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तहसीलदारांनी आखलेल्या वेळापत्रकानुसार तलाठी आठवड्यातील चार दिवस कार्यालयात उपस्थित राहतील. तसेच एक दिवस मंडल कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करतील. मंडल मुख्यालयाच्या गावाचा बाजार दिवस त्यासाठी निश्चित केला जाणार आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून मंडल कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येईल.
नागरिका आणि लोकप्रतिनिधींच्या मागणी आणि सूचनेनुसार तलाठ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीचे दिवस वाढवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर देण्यात आल्याचे या शासकीय निर्णयात नमूद करण्यात आले आहे.