पुणे : एका ७० वर्षीय महिलेच्या हृदयातील महाधमनीची झडप खराब झाली. यातच तिला स्थूलता, उच्च रक्तदाब, थायरॉईड, श्वसनविकार यासह इतर अनेक सहव्याधी होत्या. यामुळे तिच्यावर खुली हृदय शस्त्रक्रिया करणे धोक्याचे बनले होते. डॉक्टरांनी या वृद्धेवर ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टावी) प्रक्रियेसह बलून असिस्टेड बॅसिलिका शस्त्रक्रिया केली. त्यामुळे या महिलेने अखेर या गुंतागुंतीच्या हृदयविकारावर मात केली आहे.
सुरुवातीला ही महिला रुग्णालयात आली त्या वेळी तिला अनेक सहव्याधी असल्याचे समोर आले. तसेच हृदयातील महाधमनीची झडप खराब झाल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यातच या महिलेला छातीत दुखण्याचाही त्रास होता.
महाधमनीची झडप बदलण्यासाठी खुली हृदय शस्त्रक्रिया केल्यास अपंगत्व अथवा मृत्यू येण्याची जास्त शक्यता होती. याचबरोबर या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण बरा होण्यास लागणारा कालावधीही जास्त असतो. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी कमीत कमी चिरफाड होणाऱ्या प्रक्रियेला पसंती दिली. त्यावर डॉक्टरांनी ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटचा (टावी) पर्याय सुचवला.
याबाबत खराडीतील मणिपाल हॉस्पिटलमधील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. तन्मय यरमळ जैन म्हणाले, की या रुग्णाची महाधमनीची झडप बदलणे गरजेचे बनले होते. रुग्णाचे वय, सहव्याधी आणि धमनीमध्ये अडथळा निर्माण होण्याच्या वाढलेल्या शक्यता याच्यामुळे हे प्रकरण अत्यंत जोखमीचे बनले होते. रुग्णाच्या हृदय व रक्तवाहिन्यांच्या विशिष्ट रचनेमुळे या प्रकरणामध्ये गुंतागुंत आणखी वाढली होती.
महाधमनीच्या झडपेच्या आतमध्ये कॅल्शिअमचा थर जमा झाला होता. याचबरोबर सर्वसाधारण स्थितीपेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या धमनीमुळे आणखी धोका होता. त्यामुळे टावीदरम्यान या धमनीमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. टावीनंतर उद्भवू शकणारा धोका कमी करण्यासाठी बलून-असिस्टेड बॅसिलिका तंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रक्रियेमध्ये झडपेच्या खराब झालेल्या पाकळ्यांचे विभाजन करण्यासाठी बलूनच्या आधारे इलेक्ट्रिक गाईडवायरचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे रक्त खुलेपणाने वाहून व झडपांना धमनीतील रक्तप्रवाहात अडथळा आणण्यापासून रोखले गेले. त्यानंतर खराब झालेल्या महाधमनी झडपेच्या ठिकाणी नवीन झडप बसविण्यात आली. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पायावाटे, बाहेरून एकही टाका न घालता पार पडली.
रुग्णाला प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी हालचाल करता येऊ लागली व चौथ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले, असे डॉ. जैन यांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया डॉ. तन्मय यरमळ जैन यांच्यासह डॉ. सूरज नृसिंहन आणि मणिपाल हॉस्पिटल, खराडी, पुणेच्या हृदयविकार पथकाने केली.
टावीसह बलून-असिस्टेड बॅसिलिका हृदय शस्त्रक्रियांमधील सर्वाधिक गुंतागुंतीची प्रक्रिया असून, ती क्वचितच केली जाते. दुर्मीळ आणि गुंतागुंतीच्या हृदयविकाराची ही प्रक्रिया आमच्या वैद्यकीय अचूकतेने केली. या प्रक्रियेमुळे रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी होऊन तो लवकर रुग्णालयातून घरी जाऊ शकला. – परमेश्वर दास, संचालक, मणिपाल हॉस्पिटल (खराडी).