पुणे : काश्मीर प्रश्नासंदर्भात पाकिस्तानशी चर्चा सातत्याने सुरू ठेवली पाहिजे. तरच काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि विकासाला चालना मिळेल. अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी चर्चा सुरू ठेवली म्हणून त्यावेळी दहशतवादी कारवाया कमी झाल्या. आता ३७० कलम हटविण्यात आले असले तरी दहशतवादाची टांगती तलवार कायम आहे, असे मत ‘रॉ’चे माजी संचालक ए. एस. दुलत यांनी बुधवारी व्यक्त केले.
सरहद संस्थेच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ‘रॉ’ या गुप्तचर विभागाचे माजी संचालक ए. एस. दुलत यांनी लेखक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. संजय नहार, युवराज शहा आणि शैलेश पगारिया या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> अजित पवार यांच्या त्या निर्णयामुळे महायुतीमध्ये संघर्षाची ठिणगी, वाद न्यायालयात जाण्याची वेळ, नेमके झाले काय?
काश्मीरमधील परिस्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. बंद, संप आणि दगडफेक थांबली असली तरी दहशतवादी कारवाया संपल्या आहेत, असे म्हणता येणार नाही. ‘काश्मीरचे गाझा होऊ शकेल’, या फारूक अब्दुल्ला यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवल्याशिवाय दहशतवाद थांबणार नाही, असे मत दुलत यांनी व्यक्त केले.
काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच तेथे राजकीय प्रक्रिया सुरू करायला हवी. देशात केंद्र सरकार आहे. राज्यांमध्ये लोकनियुक्त सरकार आहे. त्या धर्तीवर काश्मीरमध्ये राजकीय पक्षाचे सरकार का नाही, असा सवाल दुलत यांनी उपस्थित केला. केवळ ३७० कलम हटवून आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश करून प्रश्न सुटणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘नियंत्रण रेषाच आंतरराष्ट्रीय सीमा करावी’
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी नियंत्रण रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा केली जावी, अशी अपेक्षा ए. एस. दुलत यांनी व्यक्त केली. दोन्ही देशांतून येण्याजाण्याची सुविधा असली पाहिजे. त्यासाठी दोन्ही देशांच्या नेतृत्वाकडे जिगर असायला हवी, अशी टिप्पणी करून दुलत यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदीही पाकिस्तानला भेट देतील, असा आशावाद व्यक्त केला. राष्ट्र दिवाळखोरीत असते तेव्हाच दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन दिले जाते, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानच्या वर्तनावर भाष्य केले.
राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून मी दिल्लीमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो. त्यांनी बोलावले म्हणून गेलो. चालणे प्रकृतीसाठी चांगले असते. – ए. एस. दुलत, माजी संचालक, ‘रॉ’