लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला असून अधिकृरित्या संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. वाघेरे यांची आज उमेदवारी जाहीर झाली असून त्यांची लढत महायुतीतील शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिलेल्या वाघेरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवबंधन हाती बांधले. पिंपरी विधानसभा मतदारसंघ आरक्षित असलेल्याने पिंपरीगावात वास्तव्यास असलेले वाघेरे हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. दहा वर्षांपासून त्यांची तयारी सुरु होती. परंतु, संधी मिळाली नाही. आता मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून लढण्याची संधी वाघेरे यांना मिळाली.

आणखी वाचा-सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष प्रवेश करताच वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होते. मागील तीन महिन्यांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. रायगड दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच वाघेरे यांची उमेदवारी जाहीर केली होती. आज अधिकृतरित्या वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. वाघेरे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवित असून त्यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे.