लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: विवाहाच्या आमिषाने नेपाळमधील एका युवतीला तरुणाने पळवून पुण्यात आणले. युवतीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केले. युवतीच्या भावाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तो नेपाळहून पुण्यात आला आणि एका सामाजिक संस्थेला याबाबतची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अल्पवयीन युवतीची तरुणाच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणी तरुणाच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मोहम्मद रफीक शेख (वय २३, सध्या रा. येरवडा, मूळ रा. नेपाळ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेख मूळचा नेपाळचा आहे. त्याने नेपाळमधील १७ वर्षीय अल्पवयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. युवतीला फूस लावली. आरोपी शेख बिगारी काम करतो. त्याने तिला पुण्यात आणले. येरवडा भागातील एका खोलीत त्याने तिला डांबून ठेवले. शेखने तिला बाहेर जाण्यास तसेच शेजाऱ्यांशी बोलण्यास मज्जाव केला होता. शेखने युवतीवर अत्याचार केले. शेख कामावर गेल्यानंतर तिला खोलीत कोंडून ठेवत होता. शेखच्या त्रासामुळे युवती घाबरली होती. तिने शेखच्या नकळत त्याच्या मोबाइलवरुन नेपाळमधील भावाशी संपर्क साधला. याबाबतची माहिती तिने भावाला दिली.

हेही वाचा… पिंपरी: बालचमूंची पावले सायन्स पार्क, तारांगणाकडे

त्यानंतर युवतीचा भाऊ पुण्यात आला. त्याने हडपसर भागातील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधला. सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी युवतीचा शोध घेण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळगावे, अश्विनी पाटील यांनी युवतीचा शोध घेण्यास सुरूवात केले.

हेही वाचा… मुंबईमुळे मिळेना पुण्यात रेल्वेत पाणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार युवती येरवड्यातील गोल्फ क्लब भागात असल्याची माहिती मिळाली. दाट वस्तीच्या परिसरात युवतीचा शोध घेण्यात अडचण निर्माण झाली होती. नेपाळमधील भावाने पोलिसांना ती राहत असलेल्या भागाचे वर्णन दिले होते. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांना पाहताच तिने भावाला खुणावले. पोलिसांनी तिची खोलीतून सुटका केली. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलिसांनी युवतीला तिच्या भावाच्या ताब्यात दिले. बहिणीची सुखरुप सुटका झाल्याने भावाच्या डोळ्यात आनंदाश्रृ तरळले. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयु्क्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.