पुणे : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) पुणे, मुंबईतील कॉल सेंटरवर छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एका बँक अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना ‘सीबीआय’ने मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
‘सीबीआय’ने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, पुणे, मुंबईतील काॅल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती ‘सीबीआय’च्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती. फसवणुकीतून मिळालेली रक्कम बनावट बँक खात्यात वळविण्यात आली होती. संबंधित बँक अधिकारी व आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडल्याची माहिती मिळाली होती. काही रक्कम हवालामार्फत हस्तांतरित केली जायची. दरमहा साधारणपणे तीन ते चार कोटी रुपयांची फसवणूक केली जात होती.
याबाबतची माहिती ‘सीबीआय’च्या पथकाला मिळाली. त्यानुसार, काॅल सेंटरचालकासह कर्मचाऱ्यांच्या सदनिकांवर छापे टाकून रोकड जप्त करण्यात आली. कॉल ल सेंटरमधील एका कर्मचाऱ्याच्या सदनिकेतून अमली पदार्थही जप्त करण्यात आले. या कारवाईत ‘सीबीआय’च्या पथकाने २७ मोबाइल संच, १७ लॅपटॉप, आभासी चलन, रोकड असा मुद्देमाल जप्त केला.
‘सीबीआय’च्या पथकाने सात ठिकाणी कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपींनी फसणूक करण्यासाठी समाजमाध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. आभासी चलनात गुंतणूक, तसेच गिफ्ट कार्डच्या आमिषाने आरोपींनी फसवणूक केली.
बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून आरोपी दरमहा तीन ते चार कोटी रुपये मिळवित होते. फसवणुकीतून मिळालेली रक्कम आरोपी बनावट नावाने उघडलेल्या बँक खात्यांत हस्तांतरित करायचे. आरोपींना काही रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली होती. आरोपींकडून दहा लाख २० हजार, तसेच सहा लाख ९४ हजार रुपये मूल्य असलेले आभासी चलन, १५० ग्रॅम अमली पदार्थ, लॅपटॉप, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा सीबीआय मुंबई कार्यालयाकडून तपास करण्यात येत आहे. यापूर्वी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने खराडी भागातील एका कॉल सेंटर छापा टाकला होता. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक प्रकरणात मुंबई, तसेच गुजरातमधील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.