राज्य शासनानं ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा, अन्यथा १ ऑक्टोबर रोजी होणारा संप अटळ असेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांसंदर्भात आंबेडकर यांनी आज पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आंबेडकर म्हणाले, “१ ऑक्टोबरनंतर ऊसतोड मजूर कामावर जाणार नाहीत. ऊतसोड मजुरांची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, तसेच त्यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी या दोघांचही नुकसान होऊ नये, हे शासनानं पहावं.”

“आम्ही १ तारखेला संप करण्यावर अटळ आहोत. यासंदर्भात लवकरात लवकर आम्ही मेळावाही घेणार आहोत. त्यामुळं शासनानं मेळावा घेण्यासाठी परवानगी देऊ अथवा न देऊ हा मेळावा होणारच. तेव्हाच आमची भूमिकाही जाहीर केली जाईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की, त्यांनी यात लक्ष घालावं आणि ऊसतोड मजुरांना न्याय द्यावा, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.