पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजित बालभारती ते पौड फाटा या रस्त्याचा आता नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे. नवीन आराखड्यात उन्नत रस्ता (उड्डाणपूल) आणि बोगदा या विविध पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे. नवीन आराखड्यामुळे हा खर्च सुमारे ३०० कोटी रुपये होण्याचा अंदाज असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

महापालिकेने बालभारती ते पौड फाटा या नियोजित मार्गाचा आराखडा तयार केला होता. मात्र, पर्यावरणवाद्यांनी आक्षेप घेत न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळविली. त्यामुळे हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्याचा आराखडा तयार करून बराच कालावधी उलटला असल्याने सध्याची गरज लक्षात घेऊन पुन्हा नव्याने आराखडा तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

‘नव्याने आराखडा तयार करताना रस्ता, उन्नत रस्ता (उड्डाणपूल) आणि बोगदा अशा विविध पर्यायांचा विचार देखील केला जाणार आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयानुसार रस्त्यासाठी पर्यावरणीय परवानगी घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे,’ असे महापालिका आयुक्त राम यांनी सांगितले.

‘या मार्गाच्या नवीन आराखड्यानुसार सुमारे ३०० कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. या रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करून सद्य:स्थितीनुसार नव्याने प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात इतर प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, त्यामुळे या प्रकल्पासाठी पुढील अंदाजपत्रकातच तरतूद करता येणार आहे,’ असे राम यांनी स्पष्ट केले.

शिवाजीनगर आणि कोथरूड परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पर्यावरणीय परवानगीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आता नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.- नवल किशोर राम आयुक्त, पुणे महापालिका

विरोध का?

बालभारती ते पौड फाटा रस्त्याची चर्चा गेल्या २० पेक्षा अधिक वर्षांपासून सुरू आहे. हा रस्ता हनुमान टेकडी आणि एआरएआय टेकडीच्या भागातून जाणार आहे. या भागातील जमिनीखाली भूजलक्षेत्राचे प्रमाण अधिक आहे. तसेच या भागात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असल्याने पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे.