पुणे: जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात एकूण बारा अनधिकृत शाळा असून, सर्वाधिक चार शाळा हवेली तालुक्यात आहेत. संबंधित शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली. शासनाची मान्यता न घेता, कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा चालवल्या जात असल्याची प्रकरणे गेल्या काही काळात समोर आली. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. त्यानुसार बारा शाळा अधिकृतपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. अनधिकृत शाळा पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यांतील आहेत. त्यात सर्वाधिक चार शाळा हवेली तालुक्यातील आहेत.

हेही वाचा… पुणे: नवले पुलाजवळ नवीन कात्रज बोगद्यात ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

दौंड तालुक्यातील मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल, कासुर्डी येथील क्रेयांस प्री प्रायमरी स्कूल, बेटवाडी येथील के. के. इंटरनॅशनल स्कूल, हवेली तालुक्यातील किरकीटवाडी येथील कल्पवृक्ष इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी येथील क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, खडकवासला येथील किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल, लोणी काळभोर येथील पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, खेड तालुक्यातील भोसे येथील जयहिंद पब्लिक स्कूल, बावधन येथील एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, मुळशी तालुक्यातील जांभे येथील अंकुर इंग्लिश स्कूल, नेरे येथील साई बालाजी पब्लिक स्कूल, पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळा अनधिकृत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा… पुणे: आई रागावल्याने निघून गेलेली तीन भावंडे पोलिसांमुळे सुखरूप घरी परतली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकांनी आपल्या पाल्याला संबंधित अनधिकृत शाळेत दाखल करू नये. या संदर्भात पालकांनी स्वत: काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी स्थानिक पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.