रूपवेध प्रतिष्ठानतर्फे २००४ पासून दिला जाणारा ‘तन्वीर सन्मान’ स्थगित करून त्याऐवजी डॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोगिक नाटकांसाठी ३०० आसनक्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नाट्यगृह महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे उभारण्यात येणार असून डॉ. लागू यांच्या कुटुंबीयांतर्फे त्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>पोलिसांसाठी ‘पीएमपी’चे दरवाजे बंद

डॉ. लागू यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून बुधवारी रूपवेध प्रतिष्ठानतर्फे तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार प्रसाद वनारसे यांना जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. लागू यांचे पुत्र डॉ. आनंद लागू यांनी ही घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील १० लाख रुपयांच्या निधीचा धनादेश डॉ. आनंद लागू आणि डॉ. शुभांगी कानिटकर यांनी महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडे सुपूर्द केला. डॉ. लागू यांची पुुस्तके, पुरस्कार आणि भाषणे यांबाबतचे एक विशेष संग्रहालयही याच वास्तूत होणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा >>>पुणे: कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटीला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

डॉ. आनंद लागू म्हणाले, की महाराष्ट्र कल्चरल सेंटरने या नाट्यगृहाला डॉ. श्रीराम लागू यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. आम्ही त्यांना आनंदाने होकार दिला. करोना काळातील क्षणभंगूरतेनंतर डॉ. लागू यांच्या कारकिर्दीचे स्मरण ठेवणारे काही चिरस्थायी असावे, या विचारात आम्ही कुटुंबीय होतोच. त्याच विचाराचा भाग म्हणून या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला, असेही डॉ. आनंद लागू यांनी स्पष्ट केले.