पुणे : सीताफळांचा हंगाम सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी आहे. हंगामातील पहिली आवक मार्केट यार्डातील फळबाजारात मंगळवारी झाली.
सीताफळांची पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकरी दादा काळे यांच्या बागेतून २१ किलो सीताफळांची मार्केट यार्ड फळ बजारातील जय शारदा गजानन गाळ्यावर झाली. शेतकरी काळे यांनी पाच एकर क्षेत्रावर दोन हजार सीताफळांच्या झाडांची लागवड केली आहे. यंदा सीताफळांची लागवड चांगली झाली आहे, अशी माहिती फळ व्यापारी, अडते गणेश घुले यांनी दिली.

मार्केट यार्डातील फळ व्यापारी सुबोध झेंडे यांनी लिलावात २१ किलो सीताफळांची खरेदी केली. एक किलो सीताफळांना २५१ रुपये दर मिळाले. या वेळी अडते अतुल रायकर, काका कदम, किरण रायकर, शेखर जगताप, सीताराम वाडकर, माउली आंबेकर, पांडुरंग सुपेकर उपस्थित होते. यंदा पाऊस लवकर सुरू झाला आहे. पावसामुळे सीताफळांची प्रतवारी चांगली राहणार आहे. यंदा सीताफळांची लागवडही मोठ्या प्रमाणावर झाली आहे, असे शेतकरी दादा काळे यांनी नमूद केले.