पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना तळेगाव एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट पाचने जेरबंद केलं आहे. आरोपीकडून तीन पिस्तुले, सहा जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता, सहा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नीरज भिकमसिंग सेन, योगेश सारंग माहोर, सुनील ओमीप्रकाश माहोर, श्यामसिंग मुन्नीलाल कोली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा – द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकच्या आच्छादनासाठी ५० टक्के अनुदान द्यावे, शरद पवार यांची राज्य सरकारला सूचना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूच्या परिसरामध्ये असलेल्या भंडारा डोंगराच्या पायथ्याशी पाचजणांची टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाच आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. यानंतर गुन्हे शाखा आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं.

हेही वाचा – पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराच्या मानकरी; राज्याला यंदा एकच पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानीजवळ सुदवडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी थांबले होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून कोयते, पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे दरोडा टाकण्यासाठी जात होते, अशी माहिती आरोपींनी दिली आहे. परंतु, त्या अगोदरच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत सावंत यांच्या पथकाने केली.