पुणे : ‘समर्पित भावनेने काम करणाऱ्या पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलीस दल देशात अव्वल आहे,’ असे मत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले. २० व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्याचा समारोप हडपसर-रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारात झाला. यावेळी शुक्ला बोलत होत्या.

निवृत्त पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, पिंपरी-चिंचवडचे सहपोलीस आयुक्त शशिकांत महानवर, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या शारदार राऊत, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते, डाॅ. बसवराज तेली, पल्लवी बर्गे, सौरभ अगरवाल, स्वप्ना गोरे यावेळी उपस्थित होते.

शुक्ला म्हणाल्या, ‘पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या माध्यमातून पोलिसांचे तपास कौशल्य वाढीस लागते. महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा देशात अव्वल आहे. पोलीस दलातील प्रत्येक कर्मचााऱ्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलीस दल अव्वल आहे. पोलीस दलातील कर्मचारी समर्पित भावनेने काम करतात. पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी यापुढील काळात प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे.’

पोलीस निरीक्षक अर्चना कदम यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. राजेंद्र डहाळे यांनी आभार प्रदर्शन केले.