पुणे : पावसाळ्यात शहरात साथरोगांचा प्रार्दुभाव वाढू लागला आहे. यंदा जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली असून, आतापर्यंत २६२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. याच वेळी हिवतापाने आणि चिकुनगुनियानेही डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आहे.

पावसाळ्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन कीटकजन्य आजारांमध्ये दर वर्षी वाढ होते. यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली असून, हिवताप आणि चिकुनगुनियाचेही रुग्णही आढळून येत आहेत. शहरात या महिन्यात डेंग्यूचे २६२ संशयित रुग्ण आढळले. त्यांपैकी ११ रुग्ण हे डेंग्यूचे निदान झालेले आहेत. यंदा डेंग्यूचे ५१५ संशयित आणि २३ निदान झालेले रुग्ण आढळले आहेत. त्यात जानेवारी संशयित ३९ रुग्ण, फेब्रुवारी संशयित ३१ व निदान ४, मार्च संशयित १८ रुग्ण, एप्रिल संशयित १९ व निदान २, मे संशयित २३ व निदान २, जून संशयित १२३ व निदान ४ अशी रुग्णसंख्या आहे.

शहरात जुलैमध्ये चिकुनगुनियाचे २ रुग्ण आढळले असून, या वर्षातील एकूण रुग्णसंख्या १२ वर पोहोचली आहे. त्यात फेब्रुवारी ६ रुग्ण, एप्रिल २ रुग्ण, जून २ रुग्ण आणि जुलैमध्ये २ रुग्णांचा समावेश आहे. याच वेळी हिवतापाचे २ रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षभरात हिवतापाच्या एकूण ३ रुग्णांची नोंद झाली आहे. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये वाढ होत असल्याने कीटकनाशक फवारणी मोहिमेला गती देण्यात आली आहे. याचबरोबर डासोत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.

कारवाईची मोहीम

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी तयार होतात. या डबक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होऊन कीटकजन्य आजारांचा प्रसार वाढतो. शहरात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डासोत्पत्ती स्थाने शोधण्यावर भर दिला आहे. ही स्थाने आढळून येत असलेली घरे आणि आस्थापनांना नोटीस बजावून दंड केला जात आहे. याप्रकरणी जुलैमध्ये १९७ जणांना नोटीस बजावून ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जुलैमधील रुग्णसंख्या

– डेंग्यूचे संशयित रुग्ण : २६२

– डेंग्यूचे निदान झालेले रुग्ण : ११

– हिवतापाचे रुग्ण : २

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– चिकुनगुनियाचे रुग्ण : २