इंदापूर : ऊसाच्या पानांचे असंख्य वार अंगावर झेलत मुलाच्या भवितव्याचे वडिलांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. ऊस बांधणी करणाऱ्या या शेतकऱ्याचा मुलगा साखर कारखान्याचा कार्यकारी संचालक झाला आहे.
ही कहाणी आहे गिरीश झगडे या तरुणाची. कुंडलिक झगडे यांंचा हा सुपुत्र. इंदापूर तालुक्यातील काझड गावातील रहिवासी असलेले हे झगडे कुटुंब. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गिरीश झगडे यांचे बालपण कष्टात गेले. त्यांच्या वडिलांनी दुसऱ्याच्या शेतात बैलांच्या साहाय्याने ऊस बांधणीचे काम केले. गिरीश यांनीही अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना सुट्यांमध्ये काही काळ वडिलांबरोबर ही कामे केली. मात्र, कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
गिरीश शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज या साखर कारखान्यात को-जेन व्यवस्थापक म्हणून काम करत होते. आता त्यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी बैलजोडी हाच एकमेव आधार कुंडलिक झगडे यांच्याकडे होता. वाढलेल्या उंच ऊसामध्ये बैलांच्या साहाय्याने ऊसाच्या टोकदार आणि धारदार पानांचा सामना करीत ऊस आणि मातीशी अहोरात्र झगडून त्यांनी दुसऱ्याच्या शेतात ऊस बांधणीचे काम केले. आजही ते दुसऱ्याच्या शेतामध्ये ऊस बांधण्याचे काम करत आहेत. पण, त्यांनी मुलाच्या भवितव्याचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.
विविध पदांवर काम
अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर गिरीश यांनी बारामती ॲग्रो, निरा-भिमा सहकारी, शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज, ज्युबिलंट सायन्स, अंबालिका शुगर, सुभाष शुगर यांसारख्या नामांकित साखर कारखान्यांमध्ये विविध पदांवर काम केले. ते शरयू ॲग्रो येथे को-जेन व्यवस्थापक म्हणून कार्यरत असतानाच आता ते या कारखान्याचे कार्यकारी संचालक झाले आहेत. शरयू ॲग्रो लिमिटेडचे अध्यक्ष श्रीनिवास पवार आणि संचालक युगेंद्र पवार यांचे त्यांना प्रोत्साहन लाभले.