पिंपरी: शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्यांचा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात प्रदूषणाचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत. नद्यांमधील जलपर्णी, जलप्रदूषणाबाबत आमदारांनी प्रश्न विचारले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. तळवडेपासून चऱ्होलीपर्यंत इंद्रायणी नदीचे प्रदूषण वाढले आहे. तर, किवळेपासून दापोडीपर्यंत पवना नदीचे प्रदूषण वाढले आहे. नदीलगतच्या भागात किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे, वाल्हेकरवाडी, थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, पिंपरी, दापोडी, पिंपळेगुरव, सांगवी, कासारवाडी व दापोडीपर्यंत पाण्याचे प्रदूषण वाढल्याचे दिसून येते. मागील पावसाळ्यात पवना नदीतील पाण्यावर पाचवेळा तवंग आले. प्रदूषणामुळे जलचर प्राणी मृत पडत आहेत.

हेही वाचा… तलाठी भरतीतील अडचणींचा फेरा संपेना; आता ‘या’ कारणामुळे भरती रखडणार

औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. इंद्रायणी नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहेत. कार्तिकी यात्रेच्या सुरुवातीलाही पाण्यावर तवंग आले होते. त्यामुळे वारकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. नदी सुधार प्रकल्प कागदावरच असून सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पवना, इंद्रायणीचा समावेश आहे.

पुनावळेतील प्रस्तावित कचरा भूमीचाही प्रश्न गाजणार

पुनावळेतील कचरा भूमीची आरक्षित जागा महापालिकेने वन विभागाकडून ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्याने स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. दुचाकी रॅलीसह सातत्याने आंदोलन केले जात आहे. त्यामुळे प्रस्तावित कचरा भूमीचा प्रकल्प रद्द करण्याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सात गावांच्या समावेशाला मान्यता?

शहरालगतच्या गहुंजे, जांबे, मारूंजी, हिंजवडी, माण, नेरे आणि सांगवडे या सात गावांचा महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव आठ वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडून आहे. याबाबतही प्रश्न उपस्थित करत मंजुरी देण्याची मागणी केली आहे.