संजय जाधव
पुणे : शिवाजीनगर एसटी स्थानक वाकडेवाडीला हलवून तीन वर्षे उलटल्यानंतरही त्याचा घोळ संपत नसल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर स्थानक मूळ जागी उभारण्याच्या प्रस्तावावर अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. याचवेळी वाकडेवाडी येथील एसटी स्थानकाचे भाडे वर्षभरापासून कुणीच भरत नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. यावरून महामेट्रो, दुग्धविकास आणि एसटी हे तीन विभाग आमनेसामने आले आहेत.
शिवाजीनगर एसटी स्थानकाची चार एकर जागा होती. त्यातील एक एकर जागा महामेट्रोला भुयारी मेट्रो स्थानक उभारण्यासाठी देण्यात आली. याबाबत मेट्रो आणि एसटीमध्ये करार झाला होता. शिवाजीनगर स्थानक पाडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात ते वाकडेवाडी येथे दुग्धविकास विभागाच्या जागेत हलवण्यात आले. या जागेचे भाडे मेट्रो दुग्धविकास विभागाला देणार असा निर्णय झाला होता. तीन वर्षांच्या कालावधीसाठी हे ठरले होते. मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले तरीही एसटी स्थानक अजूनही वाकडेवाडी येथेच आहे.
हेही वाचा >>> वानवडीतील अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला, बालकल्याण समिती आणि पोलिसांची सतर्कता
शिवाजीनगरहून स्थानक डिसेंबर २०१९ मध्ये वाकडेवाडीला हलवण्यात आले. त्याआधीच मेट्रो आणि दुग्धविकास विभागात भाड्यासंदर्भात करार झाला. होता. हा तीन वर्षांचा करार मार्च २०२२ मध्ये संपला. त्यानंतर मेट्रोने या जागेचे भाडे देणे बंद केले आहे. या जागेचे दरमहा भाडे सुमारे ४७ लाख रुपये आहे. आता हे भाडे कुणी भरायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाडे थकल्याने दुग्धविकास विभागाक़डून जागा रिकामी करण्याबाबत मेट्रोला पत्रे पाठवली जात आहेत. ही पत्रे मेट्रोकडून एसटीकडे पाठवली जात आहेत, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
वादाचा मुद्दा नेमका काय? मेट्रोने एसटी स्थानकाच्या इमारतीसाठी तळमजला बांधून देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, एसटीने सार्वजनिक खासगी भागीदारीतून तिथे स्थानक आणि व्यापारी संकुल अशी इमारत उभारण्याचा प्रस्ताव ठेवला. या संकुलाबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आता वाकडेवाडी येथील जागेचा भाडेकरार संपला आहे. त्यामुळे मेट्रोने भाडे देणे बंद केल्याने मूळ जागी फक्त स्थानक बांधून द्यावे, असे एसटी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, मेट्रोने याला नकार दिला आहे. यावर उच्चस्तरीय बैठका सुरू असूनही अद्याप तोडगा निघालेला नाही.
हेही वाचा >>> संपामुळे ठप्प झालेले काम पूर्ण करण्यासाठी आता शनिवार, रविवारी काम करण्याचे निर्देश
शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या जागेतील एक एकर जागेच्या बाजारमूल्याएवढा तळमजला मेट्रो बांधून देईल, असे आधी ठरले होते. एसटीकडून तिथे नवीन स्थानक उभारले जाणार होते. परंतु, एसटीकडून त्याचा आराखडा मेट्रोला पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्हाला तळमजला बांधून देता आलेला नाही. याचबरोबर वाकडेवाडी येथील जागेचा भाडेकरार ३ वर्षांचा होता. तो संपल्याने आम्ही भाडे भरणे बंद केले आहे.
– हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो
शिवाजीनगर एसटी स्थानकाचा मुद्दा उच्चस्तरीय पातळीवर आहे. त्यावर विभागीय पातळीवर काहीही निर्णय घेतला जात नाही. मेट्रोकडून वाकडेवाडी येथील स्थानकाचे भाडे देणे बंद करण्यात आल्याबाबत काहीही माहिती नाही. मेट्रोने भाडे देणे अपेक्षित आहे.