पुणे : शहरात बेकायदा पद्धतीने टाकण्यात आलेल्या ओव्हरहेड केबलवर कारवाई करण्यास महापालिकेने सुुरुवात केली आहे. मागील दोन दिवसांत सुमारे ३६ किलाेमीटर लांबीच्या केबल विद्युत विभागाने काढून टाकल्या आहेत. ही कारवाई पुढे सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
पुणे शहरात ओव्हरहेड केबल टाकण्यास महापालिका कोणतीही परवानगी देत नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करत अनेकांनी केबल टिव्ही तसेच इंटरनेटच्या केबल बेकायदा पद्धतीने टाकल्याचे समोर आले आहे. शहरातील इमारती, महापालिकेने उभारलेले रस्त्यावरील खांब यावरुन या केबल टाकण्यात आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी अशीच एक केबल गळ्याभोवती अडकल्याने एक तरुण जखमी झाला होता. नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावर हा अपघात झाला होता. त्यावरून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठविण्यात आली होती. बेकायदा ओव्हरहेड केबलमुळे शहराचे विद्रुपीकरण हाेते.
या घटनेनंतर महापालिकेच्या विद्युत विभागाने बेकायदा पद्धतीने टाकण्यात आलेल्या ओव्हरहेड केबलवर कारवाई करण्यास सुुरुवात केली आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांत महापालिकेने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयानुसार कारवाई सुरू केली आहे. यामध्ये सुमारे ३६ हजार २६० मीटर (३६ किमी) लांबीच्या केबल काढण्यात आल्या. या कामासाठी महापालिकेने नव्याने पाच क्रेन भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत, अशी माहिती विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली. विद्युत विभागाकडे यापूर्वी १३ क्रेन हाेत्या. त्यामध्ये नवीन पाच क्रेनची भर पडल्याने कारवाईला वेग आल्याचा दावा शेकटकर यांनी केला.
महापालिकेच्या विद्युत विभागाकडून ओव्हरहेड केबलवर कारवाई करून त्या काढल्या जातात. मात्र, या केबलचे नक्की करायचे काय? असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. या केबलमध्ये धातू नसल्याने त्याची खरेदी करण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जप्त करण्यात आलेल्या केबलचे तुकडे करून त्याचा पुर्नवापर करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात बेकायदा पद्धतीने टाकण्यात आलेल्या ओव्हरहेड केबलवर कारवाई करून त्या काढून टाकण्यास विद्युत विभागाने सुरुवात केली आहे. दोन दिवसांत ३६ किलोमीटर केबल काढून टाकण्यात आल्या.- मनीषा शेकटकर, विद्युत विभाग प्रमुख, पुणे महापालिका