पुणे : बैठी जीवनशैली, ताणतणाव आणि अनुवांशिकतेमुळे तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढत चालली आहे. वेळीच निदान, जीवनशैलीत बदल, फिजिओथेरपी आणि मिनीमली इव्हेसिव्ह प्रक्रियांसारख्या प्रगत उपचारांमुळे रुग्णांना पुढील आयुष्य व्यवस्थितपणे जगता येते. संधिवात हा आता केवळ वयोवृद्धांपुरता मर्यादित नसून २० ते ५० वयोगटातील व्यक्तींमध्येही संधिवाताचे निदान होत आहे आणि रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बरेच तरुण रुग्ण सांध्यांमधील कडकपणा किंवा सूज येणे यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, परंतु भविष्यात त्यांना दीर्घकालीन वेदनांचा सामना करावा लागतो, अशी भूमिका अस्थिविकारतज्ज्ञांनी जागतिक संधिवात दिनानिमित्त मांडली.

दर महिन्याला बाह्य रुग्ण विभागांमध्ये उपचारांसाठी दाखल होणाऱ्या दहापैकी चार व्यक्तींना सांधेदुखी आणि संधिवाताशी संबंधित कडकपणाची लक्षणे दिसून येतात. जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे, व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पद्धत, दुखापती, लठ्ठपणा, स्वयंप्रतिकार स्थिती, कौटुंबिक इतिहास आणि ताण हे घटक या स्थितीस कारणीभूत ठरतात. सांधे कडक होणे, वेदना, सूज, उष्णता, हाडांची लवचिकता कमी होणे आणि थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. जर संधिवाताकडे दुर्लक्ष केले तर दीर्घकालीन वेदना, सांध्यांमधील विकृती, अपंगत्व आणि जीवनाची गुणवत्ता खालावू शकते. नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात राखणे आणि तणावाचे व्यवस्थापन करणे हे जीवनशैलीतील बदल या आजाराची प्रगती रोखण्यात मदत करतात, अशी माहिती अस्थिविकारतज्ज्ञांनी दिली.

वेळीच लक्ष न दिल्यामुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. लवकर निदान केल्याने सांध्यांची सूज नियंत्रित करण्यास, वेदना कमी करण्यास आणि दीर्घकालीन नुकसान टाळण्यास मदत होते. वेळोवेळी फिजिओथेरपी, औषधे आणि प्रगत उपचार प्रक्रिया रुग्णांना दीर्घकालीन आराम देतात आणि अपंगत्व टाळण्यास मदत करतात. नियमित शारीरिक हालचाली, निरोगी, संतुलित आहार, वजन नियंत्रित राखणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि वैद्यकीय उपचारांनी या समस्येला प्रतिबंध करता येऊ शकतो. म्हणून, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळीच वैद्यकीय मदत घ्यायला विसरु नका, असा सल्ला अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील अस्थिशल्यचिकित्सक डॉ. अनुप गाडेकर यांनी दिला.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील स्पाईन सर्जन डॉ. विशाल चौधरी म्हणाले की, संधिवाताचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधांबरोबरच कडकपणा आणि वेदना कमी करण्यासाठी फिजिओथेरपी आणि शरीराची हालचाल फायदेशीर ठरते. ऱ्ह्युमॅटाईड आर्थरायटिसच्या व्यवस्थापनासाठी गरज पडल्यास बायोलॉजिकल इंजेक्शन्स आणि अँकिलोजिंग स्पाँडिलायटिसच्या उपचारासाठी इम्युनोमोड्युलेटरी थेरपी दिली जाऊ शकते. वयोमानामुळे होणाऱ्या ऑस्टिओआर्थरायटिसच्या उपचारामध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमुळे अधिक अचूकता साध्य होऊ शकते.

संधिवाताचे प्रकार

ऑस्टियोआर्थराइटिस : हा संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामध्ये सांध्यातील कुर्च्याची (कार्टिलेज) झीज होते, ज्यामुळे हाडे एकमेकांवर घासली जातात.

रुमेटाईड आर्थरायटिस : यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती सांध्यांच्या अस्तरावर हल्ला करते. यामुळे सांध्यांमध्ये सूज, वेदना आणि कडकपणा येतो. याची लक्षणे सहसा सकाळच्या अधिक तीव्र असतात.

सोरायटिक संधिवात : हा सोरायसिस नावाच्या त्वचेच्या आजाराशी संबंधित आहे. यात सांध्यांव्यतिरिक्त त्वचेवरही परिणाम होतो.

गाऊट : हा एक वेदनादायक संधिवात आहे जो रक्तातील यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्याने होतो. हे युरिक ऍसिड क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा झाल्यामुळे तीव्र वेदना होतात आणि सूज येते.

मुलांमधील संधिवात : हा लहान मुलांमध्ये आढळणारा संधिवात आहे. याची लक्षणे वयाच्या १६ वर्षांपूर्वी दिसतात आणि आयुष्यभर टिकून राहू शकतात.

संधिवाताचे करा व्यवस्थापन

नियमित व्यायाम :

चालणे, योगा, पोहणे किंवा स्ट्रेचिंग यासारखे सौम्य व्यायाम सांध्यांमधील कडकपणा कमी करतात आणि सांध्यांची हालचाल सुलभ करतात.

संतुलित आहार:

ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त आहाराचे सेवन यामध्ये मासे, अक्रोड, जवसाच्या बिया यांचा समावेश करा. साखर, फास्टफूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा

वजन नियंत्रण राखा.

जास्त वजन हे सांध्यांवर ताण आणते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे हे संधिवात नियंत्रणाचे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

तणावाचे व्यवस्थापन:

ध्यान, प्राणायाम आणि पुरेशी झोप यामुळे तणाव कमी करण्यास मदत होते.

औषधोपचार आणि फिजिओथेरपी:

डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार आणि फिजिओथेरपी केल्यास संधिवाताची तीव्रता कमी करण्यास मदत होते.