केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी या चर्चांवर मौन सोडलं असून आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या देशातील आणि राज्यातील नेत्यांचं अभिनंदन करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी मांडलेली भूमिका भाजपाची असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते आहोत. पंकजा मुंडे यांनी मांडलेली भूमिका हीचं भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे”, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज पुण्यात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा- “मुंडे साहेबांना तर शपथही घेता आली नव्हती”, पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत झाल्या भावुक!

भागवत कराड मुंडे साहेबांनी उभं केलेल नेतृत्व

सामनामध्ये पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव आहे असं म्हणण्यात आलं आहे. यावर फडणवीस म्हणाले, सामनाने आमच्याबद्दल, भाजपबद्दल कधी चांगलं लिहलयं का? भागवत कराड हे नेतृत्व मुंडे साहेबांनी उभं केलेल आहे. त्यामुळे मला जेवढा आनंद झाला. तेवढा पंकजा मुंडेना झाला आहे.

यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला वाटत नाही भाजपाला मला संपवायचं आहे. मला वाटत नाही की मी एवढी मोठी आहे की पंतप्रधानांपासून सर्व कामाला लागतील. त्यांनी जे लिहिलंय ते वाचलं नाही. वाचल्यावर प्रतिक्रिया देईन,”

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे

“आमच्या नावाची नेहमी चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचं कारण नाही. आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणं कर्तव्य आहे,” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

प्रीतम मुंडेंना संधी मिळायला हवी होती का ?

“भाजपामध्ये एक पद्धत आहे, त्याचप्रमाणे निर्णय घेतले जातात. सगळ्या राज्यांच्या बाबतीत वेगवेगळे निर्णय झाले होते. फक्त प्रीतम मुंडे नाही तर हिना गावित यांचंही नाव चर्चेत होतं. नव्या लोकांना संधी देण्यास काही हरकत नाही, त्यांच्यात काही गुण असू शकतात जे पक्षासाठी भविष्यात फायद्याचे ठरु शकतात. त्यामुळे हरकत असण्याचं कारण नाही,” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

प्रीतम मुंडे यांचं नाव योग्य होतं

“जे मत असतं ते वैयक्तीक असतं. ते जाहीरपणे व्यक्त करायचं नसतं. प्रीतम मुंडे यांचं नाव होतं आणि ते योग्य होतं. त्या विक्रमी मताने निवडून आल्या आहेत. त्यांनी छान काम केलं, खूप हुशार आहेत. सर्व बैठकींना त्या उपस्थित असतात. कोणताही कार्यक्रम डावललेला नाही. तरुण आहेत, बहुजन चेहरा आहेत. म्हणून त्यांचं नाव न येण्यासारखं काही नाही. केवळ प्रीतम ताईंचंच नाव आलं नाही असं नाही. चर्चा नावाच्या वलयामुळे होत आहे,” असं यावेळी त्या म्हणाल्या.

“पक्षाचे निर्णय पटण्याचा विषय नाही. कारण पक्षाने मला फॉर्म भरायला लावला तेव्हाही मी पात्र आहे का असं विचारलं होतं. नंतर त्यांनी रमेश आप्पा कराड यांचं नाव अंतिम झाल्याचं सांगितलं होतं. तो निर्णयही मला पटला होता. पक्ष आमच्या संस्कारात अंतिम सत्य आहे. त्यामुळे निर्णय पटणं आणि न पटणं हा प्रश्न नसतो,” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The role played by pankajatai belongs to bjp says devendra fadnavis srk
First published on: 09-07-2021 at 16:58 IST