scorecardresearch

आरोपी ज्या कंपनीत काम करायचा तिथल्या कामगारांच्या दुचाकी चोरायचा

पिंपरीतील दुचाकी चोरीचे कनेक्शन परळीत; २१ दुचाकीसह आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ( छायाचित्र – कृष्णा पांचाळ )

Pimpari, Chinchwad, Parli, thief, steal bikes, company ,
आरोपी ज्या कंपनीत काम करायचा तिथल्या कामगारांच्या दुचाकी चोरायचा

पिंपरी : नामांकित कंपनीत हेल्पर म्हणून काम करणाऱ्या कामगाराने त्याच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या दुचाकी चोरण्याचा प्रताप केला आहे. कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी प्रदीप आश्रूबा डोंगरे याने नंतर नोकरी सोडून पिंपरी- चिंचवड शहरातील इतर दुचाकी देखील चोरल्या आहेत. त्याच्याकडून २१ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून प्रदीप आणि चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्या इरफान मेहबूब शेखला गुन्हे शाखा युनिट दोनने बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप ज्या नामांकित कंपनीत काम करत होता तिथे त्याने बारा दुचाकी चोरल्या असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप डोंगरे हा बीड जिल्ह्यातील मोहा, तालुका परळी येथील आहे. काही महिन्यांपूर्वी तो पिंपरीतील अग्रगण्य कंपनीत हेल्पर म्हणून काम करायचा. त्याला १० ते १५ हजार महिना पगार होता. मात्र तो समाधानी नव्हता, म्हणून त्याच कंपनीत काम करायला येणाऱ्या कामगारांच्या तो दुचाकी चोरायचा आणि थेट परळी गाठून इरफान शेखला कमी किंमतीत विकायचा. प्रदीपला कमी वेळेत, कमी मेहनतीत चांगले पैसे मिळत असल्याने नोकरी सोडून दुचाकी चोरण्यास सुरू केले. दुचाकी चोरली की तो थेट परळी गाठून इरफान ला दुचाकी विकायचा. याचा संशय पोलिसांच्या खबऱ्याला आला आणि त्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला.

हेहा वाचा… पुणे : हडपसरमध्ये चार वर्षांच्या मुलीचा आईकडून चाकूने भोसकून खून

हेही वाचा… पुणे : मेट्रोची रुबी हॉलपर्यंत धाव, चाचणी यशस्वी; एप्रिल अखेरीस सेवा सुरू होण्याची शक्यता

प्रदीपवर काही काळ लक्ष ठेवल्यावर सापळा रचत दुचाकी चोरत असताना पोलीसांनी त्याला बेड्या ठोकल्या. परळी येथून इरफानला अटक करण्यात आली. दोघांकडून २१ दुचाकी जप्त केल्या. इरफान हा ऊसतोड मजुरांना कमी किमतीत दुचाकी विकायचा असं पोलिस तपासात समोर आले आहे. दुसऱ्या एका कारवाईत आकाश अनिल घोडके आणि अमजद खान या दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. दोन कारवाईत एकूण २६ दुचाकी गुन्हे शाखा युनिट दोनने जप्त केल्या आहेत. गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, तांबोळी,स्वामी, खरात, चौधरी, इंगळे, वेताळ, दळे, राऊत, जाधव, कुडके, असवरे, कापसे, मुंढे, सानप, देशमुख, खेडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 10:04 IST

संबंधित बातम्या