राज्यातील इतर प्रांतांच्या तुलनेत पुण्याचे महाविद्यालयीन विश्व वेगळे ठरते. कारण, पुण्यात महाविद्यालयीन विश्वात असलेले नाट्यवेड. समाजमाध्यमांतील काही सेकंदांच्या ‘रील्स’चा जमाना असूनही अद्याप आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धांचा उत्साह टिकून आहे. याच आंतरमहाविद्यालयीन नाट्यपर्वाची नांदी नाट्यवाचन स्पर्धेपासून ‘लोकसत्ता लोकांकिका’सह अनेक स्पर्धांच्या विद्यार्थ्यांच्या दमदार प्रतिसादाने चुरशीच्या होतात. त्यामुळे महाविद्यालयांच्या स्तरावर या स्पर्धांसाठीची तयारी, तालमींनी यापूर्वीच वेग घेतला आहे. वर्गाबाहेरचे सर्जनशील शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठीही उपयुक्त ठरते आहे.
यंदाच्या महाविद्यालयीन नाट्यपर्वाचा प्रारंभ सिम्बायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी नाट्य मंडळातर्फे आयोजित ‘सिम्बायोसिस करंडक’ आंतरमहाविद्यालयीन मराठी नाट्यवाचन स्पर्धेने झाला. यंदा या स्पर्धेचे ४१वे वर्ष होते. प्राथमिक फेरीत ३० महाविद्यालयांतील ३७ संघांतून ९ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नाट्य संहितांचे प्रभावी सादरीकरण केले. अभिनेता विराजस कुलकर्णी, अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी प्राथमिक फेरीचे, तर अभिनेत्री विभावरी देशपांडे, लेखक-दिग्दर्शक निरंजन पेडणेकर यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले.
प्रभारी प्राचार्या डॉ. टेसी थडथील, मराठी नाट्य मंडळाचे प्रमुख डॉ. नीलेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स. प. महाविद्यालयाच्या ‘जॅकपॉट’ने सांघिक प्रथम, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या ‘शिवाजी सुपर मार्केट’ने द्वितीय, तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘हॅलो!’ने तृतीय क्रमांक पटकाविला. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘किनो’ला उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट वाचनासाठी पुष्कराज भन्साळी, आर्या वंडकर यांना, दिग्दर्शनासाठी समर्थ खळदकर, सर्वोत्कृष्ट लेखनासाठी अभिजित झाकणे आणि समर्थ खळदकर यांना गौरवण्यात आले.
नाट्यवाचन स्पर्धेनंतर आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा रंगणार आहे. तसेच, शैक्षणिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात फिरोदिया करंडक स्पर्धेत नाटक, संगीत, नृत्य, चित्र अशा विविध कला गुंफल्या जाणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या अनेक खुल्या एकांकिका स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांचा आवर्जून सहभाग असतो.
गेल्या काही वर्षांत ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाही विद्यार्थ्यांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग झाली आहे. प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीत परीक्षकांशी होणारा संवाद, राज्यभरातील एकांकिकांची मुंबईत होणारी महाअंतिम फेरी, त्याला चित्रपट-नाट्यसृष्टीतील मान्यवरांची असलेली उपस्थिती, विख्यात कलावंतांच्या हस्ते होणारा रंगारंग पारितोषिक वितरण सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. त्याशिवाय ‘लोकसत्ता लोकांकिका’मधून अनेकांना रंगभूमी, रुपेरी पडद्यावर मिळालेली संधी हे आणखी एक वेगळेपण. यंदा होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ची घोषणा येत्या काही काळात केली जाणार आहे.
महाविद्यालयीन काळातील स्पर्धांचे महत्त्व केवळ त्या काळातील उत्साह, नाट्यवेडापुरते मर्यादित नाही. या स्पर्धांतून विकसित होणारा कलाविषयक दृष्टिकोन, लेखनकौशल्य, नेतृत्व गुण, व्यवस्थापन, वेळेचे महत्त्व, संघभावना, हार-जीत पचवणे अशा अनेक बाबतींत मिळणारे धडे स्पर्धक विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठीही, किंबहुना त्यांच्या एकूणच आयुष्यातही निश्चितपणे उपयुक्त ठरतात. या स्पर्धांतील सहभागी विद्यार्थ्यांपैकी सगळेच काही कला क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहत नाहीत.
मात्र, केवळ या स्पर्धांतून कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिशा नक्कीच मिळते. किमान जाणकार प्रेक्षक घडण्यास तरी नक्कीच मदत होते. एका अर्थाने या स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी वर्गाबाहेरचे शिक्षणच ठरते. म्हणूनच या स्पर्धांकडे केवळ ‘एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी’ म्हणून पाहणे पुरेसे नाही.
chinmay.patankar@expressindia.com