पुणे : लोणी काळभोर भागात जोरदार झालेल्या पावसामुळे थेऊर परिसरात पूरस्थिती निर्माण झाल्याची घटना नुकतीच घडली. पूराचे पाणी थेऊरमधील एका वस्तीत शिरल्याने प्रशासनाने १०० हून जास्त रहिवाशांची सुटका केली. ओढ्यात अतिक्रमण करुन तेथे संरक्षण भिंंत बांधल्याने ओढ्याचे पात्र अरुंद झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल विभागाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले दोन बांधकाम व्यावसायिक भाऊ आहेत. दोघे विमानतळ रस्त्यावरील साकोरेनगर भागात राहायला आहेत. याबाबत ग्राम महसुल अधिकारी अर्जुन नागनाथ स्वामी (वय ३७, रा. वाघोली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर येथे १५ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाला. रात्री थेऊर येथील रुके वस्तीमध्ये ओढ्याचे पाणी शिरले. अग्निशमन दलाच्या जवानांसह प्रशासनाने १०० हून अधिक रहिवाशांची सुटका केली. घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. पाण्याच्या प्रवाहात शेळ्या, मेढ्या वाहून गेल्या. अपर तहसिलदार तृप्ती कोलते पाटील यांनी मंडल अधिकारी किशोर जाधव, ग्राम महसुल अधिकारी अर्जुन स्वामी यांना प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले. थेऊर -केसनंद रस्ता परिसरात गट क्रमांक ६३३ बाजूळा असलेला ओढा बुजविण्यात आल्याचे पाहणीत लक्षात आले. ओढ्याचे पात्र अरुंद करुन तेथे संरक्षक भिंत बांधण्यात आली होती.

ओढा बुुजविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी कारवाई केली होती. पूरस्थितीस बांधकाम व्यावसायिकासह सहा जण जबाबदार असल्याचे लक्षात आल्यनंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नाळे तपास करत आहेत.