गुलटेकडी भागात लूटमार करणाऱ्या चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून दुचाकी, चाकू, सोन्याचा बदाम असा मुद्देमाल स्वारगेट पोलिसांनी जप्त केला.

मुस्तफा तन्वीर खान (वय १९), आशिष अभिमान आरणे (वय २३, दोघे रा. गुलटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुलटेकडीतील गिरीधर भवन चौकात दुचाकीस्वाराला खान आणि आरणे यांना अडवले. त्याला चाकूचा धाक दाखविला. चाकूच्या धाकाने त्याच्या गळ्यातील सोन्याचा बदाम हिसकावून नेला होता. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. गिरीधर भवन चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले होते. चोरट्यांनी वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक चित्रीकरणात आढळून आला होता. खान आणि आरणे भिमाले उद्यानाजवळ थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी अनिस शेख आणि किरण भरगुडे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, सोन्याचा बदाम, चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्वारगेट पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, अशोक येवले, मुकुंद तारु, सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड आदींनी ही कारवाई केली.