लोणावळ्यातील वरसोली टोलनाक्याजवळून सिगारेटची खोकी ठेवलेला ट्रक पळविणाऱ्या चोरटय़ांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. ट्रकमध्ये तब्बल पावणेदोन कोटी रूपयांच्या सिगारेट होत्या. चोरटय़ांनी ट्रक पळविल्यानंतर ते ज्या मार्गाने गेल्याची शक्यता होती, तेथील पेट्रोलपंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांकडून रांजणगाव, वरसोली, औरंगाबाद मार्गाची पाहणी करण्यात आली होती. एके ठिकाणी ट्रक पेट्रोलपंपावर थांबला होता. ट्रकच्या मागोमाग जीप आणि दुचाकीस्वार चोरटे होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात जीपचा क्रमांक मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर भागातील चोरटय़ांची टोळी गजाआड झाली.
या टोळीचा मुख्य सूत्रधार शाहरुख शेख (वय ३०), संदीप वाघमारे (दोघे रा. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा, मारहाण असे गंभीर स्वरुपाचे बारा गुन्हे दाखल आहेत. वडगाव शेरीतील एका कंपनीत कामाला असलेल्या ट्रकचालकाने सिगारेटची खोकी ठेवलेला ट्रक पुणे-मुंबई रस्त्यावरील वरसोली टोलनाक्याजवळून चोरटय़ांनी धमकावून पळवून नेल्याची तक्रार रांजणगाव पोलीस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी दिली होती. ट्रकमध्ये ठेवलेल्या ८६५ सिगारेटच्या खोक्यांची किंमत एक कोटी ८७ लाख रुपये होती. टोलनाक्याजवळ थांबलेल्या ट्रकचालकाला ८ सप्टेंबर रोजी जीपमधून आलेल्या शेख आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी धमकावले. त्यानंतर ट्रकसह चालकाचेच चोरटय़ांनी अपहरण केले. नांदगाव भागात चालकाला सोडून दिले आणि ट्रक घेऊन चोरटे पसार झाले होते. पोलिसांकडून या गुन्ह्य़ाचा तपास सुरू करण्यात आला. चोरटय़ांची माहिती देणाऱ्यास पंधरा हजार रुपयांचे रोख बक्षीस पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील आणि त्यांच्या पथकाकडून चोरटय़ांचा माग काढण्याचे काम सुरू होते.
चोरटय़ांनी ट्रक पळविल्यानंतर ते ज्या मार्गाने गेल्याची शक्यता होती, तेथील पेट्रोलपंपावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांकडून रांजणगाव, वरसोली, औरंगाबाद मार्गाची पाहणी करण्यात आली होती. एका ठिकाणी ट्रक पेट्रोलपंपावर थांबला होता. ट्रकच्या मागोमाग जीप आणि दुचाकीस्वार चोरटे होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात जीपचा क्रमांक मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जीपचा मालक श्रीरामपूर भागातील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांचे पथक श्रीरामपूरला पोचले. तेव्हा जीपमालकाकडे बतावणी करुन चोरटय़ांनी जीप भाडेतत्त्वावर घेतल्याची माहिती मिळाली. पोलिसांना शेख आणि त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली. त्यानंतर शेखसह आठजणांना ताब्यात घेण्यात आले. शेख आणि त्याच्या साथीदारांनी तीन महिन्यांपूर्वी सिगारेटची खोकी वाहून नेणारा ट्रक पळवून नेण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्यांनी रांजणगाव भागात जाऊन कंपनीची पाहणीदेखील केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
गेल्या पाच ते सहा वर्षांत सिगारेटची खोकी वाहून नेणाऱ्या ट्रकचालकांना धमकावून सिगारेटची खोकी पळवून नेण्याच्या गुन्ह्य़ात वाढ झाली आहे. नगर रस्त्यावरील रांजणगाव भागात अनेक कंपन्यांची गोदामे आहेत. तेथील औद्योगिक वसाहतीत सिगारेट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे गोदाम आहे. या गोदामातून बाहेरगावी तसेच परराज्यात पाठवण्यात येणाऱ्या मालवाहू ट्रकवर चोरटे पाळत ठेवतात आणि वाटेत ट्रकचालकाला अडवून लुटण्यात येते. लोणावळ्यातील वरसोली टोलनाक्याजवळून ट्रक पळवण्यात आल्यानंतर पोलिसांकडून सन २०११ पासून आतापर्यंत सिगोरटची खोकी पळवणाऱ्या चोरटय़ांच्या टोळ्यांची माहिती घेण्यात येत होती. त्यापैकी एका टोळीत शेख होता. त्यानंतर त्याने स्वत:ची टोळी काढली आणि लूटमार करण्यास सुरुवात केली. सिगारेटची खोकी बाजारात चोरटय़ांकडून कमी किंमतीत विकण्यात येतात. शेख आणि त्याच्या साथीदारांकडून एक कोटी ५७ लाख रूपये किंमतीची सिगारेटची खोकी जप्त करण्यात आली आहेत. घरफोडी, लूटमार करण्यापेक्षा ट्रकचालकांना महामार्गावर अडवून सिगारेटची खोकी पळवण्याच्या गुन्ह्य़ात तेवढी जोखीम नसते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून चोरटय़ांच्या टोळीकडून सिगारेटची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना अडवून सिगारेटची खोकी किंवा अन्य माल लुटून नेण्याच्या गुन्हय़ांमध्ये वाढ झाली आहे.
पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपविभागीय आधिकारी ज्ञानेश्वर शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक साधना पाटील, अरविंद काटे, ठोसर, दीक्षित यांनी चोरटय़ांच्या टोळीला पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.