पुणे : बालेवाडी भागात पादचारी महिलेचे एक लाख ८९ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला सोमवारी (२२ सप्टेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास बालेवाडी भागातील लहू बालवडकर यांच्या कार्यालयाजवळून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख ८९ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरघाव वेगात पसार झाले. घाबरलेल्या महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यंचा माग काढण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.
नवरात्रोत्सवात बालेवाडी भागात पादचारी महिलेचे दागिने हिसकावल्याची घटना घडल्याने परिसरात घबराट उडाली. बालेवाडी भागात महिनाभरापूर्वी पादचारी महिलेचे दागिने हिसकावण्याची घटना घडली होती.