पुणे : एसटी प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलेच्या बॅगेतील तब्बल ४ लाख २९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ८ जून रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पिंपळे गुरव परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपळे गुरव परिसरात राहायला असून, ८ जून रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्या बेळगाव ते स्वारगेट असा एसटी प्रवास करीत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या बॅगेतील ४ लाख २९ हजारांचे दागिने चोरून नेले. स्वारगेट परिसरात आल्यानंतर महिलेला दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पीएमपी बस स्थानकासह एसटी स्थानकात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याचे चोरीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.