भीमा नदीकाठच्या शेतीला पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेले पंप चोरणाऱ्या चोरट्यांना लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून पावणेतीन लाख रुपयांचे नऊ कृषी पंप जप्त करण्यात आले आहेत.

आकाश सुभाष जगताप (वय २३), हर्षद केतन जगताप (वय २२, दोघे रा. न्हावी सांडस, राहू रस्ता, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पूर्व हवेलीतील भीमा नदीकाठी पिंपरी सांडस, न्हावी सांडस, खंडाेबा माळ या गावात नदीकाठाला लागून शेती आहे. नदीकाठालगत असलेल्या शेतांमधून कृषी पंप चोरीला जाण्याचे प्रकार वाढीस लागले होते. याबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.

लोणीकंद पोेलिसांनी तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार आकाश जगताप, हर्षद जगताप यांना सापळा लावून पकडण्यात आले. त्यांचे चार गुन्हे उघडकीस आले असून नऊ पंप जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गजानन जाधव, निखिल पवार, उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे, बाळासाहेब सकाटे, विनायक साळवे, अजित फरांदे आदींनी ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषी पंप चोरीमुळे शेतकरी हवालदिल
भीमानदी काठालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती आहे. कृषी पंप चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते याबाबत पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. लोणीकंद पोलिसांनी तपास करुन दोन आरोपींना पकडले. चोरलेल्या कृषी पंपाच्या विक्रीतून मिळालेले पैसे आरोपी जगताप मौजमजेसाठी वापरत होते.