स्थगिती आदेशाच्या कचाट्यात अडकलेली भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षी नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात ६०० कोटींचा खर्च होणार असून त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा महापालिकेकडून तयार करण्यात आला आहे. औंध, बाणेर आणि बालेवाडी येथून या तिसऱ्या टप्प्यातील कामांना प्रारंभ होणार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने यातील निम्मा निधी द्यावा, अशी मागणी पुणे महापालिकेने केली आहे. विशेष म्हणजे पर्यावरणप्रेमींच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून एकूण पाच हजार कोटींची योजना घाईघाईत दामटण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर सुरू झाला आहे.

साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजना महापालिकेने हाती घेतली आहे. ही योजना पूर हमी योजना असून नदीची वहन क्षमता कमी होण्याबरोबरच नदीकाठच्या शेकडो हेक्टर जमिनीचे निवासीकरण होणार आहे, असा आक्षेप नोंदवित पर्यावरणप्रेमींनी योजनेला विरोध केला होता. मात्र भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याने ती दामटण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
राज्यातील सत्ताबदलानंतर या कामांनी गती घेतल्याचे चित्र पुढे आले आहे. शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या सद्य:स्थितीचा आढावा घेणार असल्याचे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. कामांना स्थगिती आदेश नव्हता. पर्यावरणप्रेमींचे आक्षेप दूर करण्याची सूचना होती. त्यानुसार आक्षेपांचे निराकरण करण्यात आले आहे. जलसंपदा विभागानेही कामांना स्थगिती दिलेली नाही. मात्र जबाबदारीने कामे करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे योजनेची कामे थांबविण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेविरोधात पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या मध्यस्थीने महाविकास आघाडीमधील तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत महापालिका अधिकारी, जलसंपदा विभागातील अधिकारी यांची बैठक झाली. पर्यावरणप्रेमींचे आक्षेप दूर होत नाहीत तोपर्यंत या कामांना स्थगिती देण्याचा आदेश देण्यात आला. त्याविरोधात स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत चळवळ उभारल्याने योजनेची कामे थांबली होती. मात्र विरोध असतानाही तिसऱ्या टप्प्याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे.

तिसऱ्या टप्प्यात मुळा नदीच्या सुमारे आठ किलोमीटर लांबीच्या काठाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. मुळा नदी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महापािलकेच्या सीमेवरून वाहत असून औंध, बाणेर आणि बालेवाडी हा भाग नदीकाठी आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामांचा आर्थिक आराखडा तयार झाल्याने येत्या काही दिवसांत प्रत्यक्षात कामे सुरू करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने निधी देण्याची तयारी दर्शविली असून कामांबाबतची निविदा प्रक्रिया राबविण्याचे नियोजन सुरू झाल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

योजना काय?
साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा-मुठा नदीकाठाचे पुनरुज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे नियोजित आहे. त्याअंतर्गत एकूण ४४ किलोमीटर लांबीचा नदीकाठ सुशोभीत होणार आहे. नदीचे खोलीकरण, नदीकाठी उद्याने, छोटी मैदाने, जॉगींग ट्रॅक, सायकल मार्ग, विरंगुळा केंद्र अशी कामे याअंतर्गत प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन या दरम्यानच्या नदीकाठाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बंडगार्डन ते मुंढवा हा सात किलोमीटर लांबीचा नदीकाठ सार्वजनिक खासगी लोकसहभागातून विकसित केला जाईल.
पहिल्या टप्प्यातील कामे

बंडगार्डन ते संगम पूल या दरम्यान ३६२ कोटींची कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या स्तरावर ही कामे होणार असून सुशोभीकरण, सायकल मार्गाची उभारणी, संगमघाट परिसरातील पुरातन वास्तूंना धक्का न लावता सुशोभीकरण, सीमाभिंती, ताडीवाला रस्ता परिसरात संरक्षक भिंती, विविध देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड, नदीपातळीची खोली वाढविणे अशी विविध कामे या टप्प्यात होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामाचे टप्पे
मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत ४ हजार ७२७ कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा आराखडा महापालिकेकडून करण्यात आला असून पहिल्या तीन टप्प्यांची कामे करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेनेही मान्यता दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी महापालिका सातशे कोटी रुपयांचा निधी देणार असून उर्वरित दोन टप्पे सार्वजनिक खासगी लोकसहभागातून (पीपीपी) राबविण्यात येणार आहेत. संगमवाडी ते बंडगार्डन या साधारण चार किलोमीटर लांबीच्या अंतराची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील अडीच वर्षांत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर सार्वजनिक खासगी लोकसहभागातून पुढील टप्पा राबविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील कामांना औंध, बाणेर, बालेवाडीपासून सुरुवात होणार आहे.