पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायीवारी पालखी सोहळ्यासाठी देवस्थानची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, दर्शनबारी, सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. आषाढीवारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दहा जूनला देहूतून, तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदी, देहूत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थानाने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, या साठी संत तुकाराम महाराज संस्थानने काळजी घेतली आहे.

हेही वाचा >>> पुणे : पालखी सोहळ्यामुळे विद्यापीठाकडून परीक्षांचे फेरनियोजन, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

आळंदीत घातपात, चेंगराचेंगरीसारख्या घटना घडू नयेत यासाठी देऊळवाड्यात दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी १०० सीसीटीव्ही कॅमेरे, धातूशोधक यंत्रणा बसविण्यात आली. देवस्थानची सध्या चार हजार क्षमतेची दुमजली दर्शनबारी इमारत असून, भाविकांची संख्या लक्षात घेता, नदीपलीकडे तात्पुरती दर्शनबारी उभारली जाणार असून, १५ हजार भाविक एकाचवेळी दर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्यांची नोंद आहे. नव्याने ४५ दिंड्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे : सहकारी बँकांना आता आणखी अधिकार; रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय

देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी ३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सहा सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. देऊळवाड्यात सुरक्षेसाठी सोळा कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नगरपरिषद प्रशासनाने देऊळवाडा, पालखी मार्ग परिसरातील अतिक्रमणे हटविली आहेत. त्यामुळे पालखी मार्ग रुंद झाला आहे. नदी परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. एक हजार फिरती स्वच्छतागृह ठेवण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य संचाचे वाटप करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी सांगितले. वारी काळात २४ तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. पंधराशे फिरती शौचालये असणार आहेत. मंदिर, इंद्रायणी घाट परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत दिवे लावले आहेत.

हेही वाचा >>> ‘त्या’ मुलांची कुटुंबीयांशी पुन्हा झाली भेट!, रेल्वे सुरक्षा दलाकडून १६३ जणांची सुटका

खडकी येथील लष्कराच्या ५१२ डेपोमध्ये चांदीच्या रथाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. रथावर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. आठ सीसीटीव्ही कॅमेरे, जनरेटर बसविण्यात आले आहेत. पालखीचा प्रस्थान सोहळा समाजमाध्यमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. – संजय महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख, संत तुकाराम महाराज संस्थान, देहू

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी लागणारे टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्य उपलब्ध केले आहे. दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. एकावेळी १५ हजार भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहू शकतात. शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी आळंदीत पाच ठिकाणी एलईडी स्क्रीन लावले जाणार आहेत. रविवारी सायंकाळी चार ते सहा या वेळेत पालखीचे प्रस्थान होणार आहे. –ज्ञानेश्वर वीर व्यवस्थापक, आळंदी देवस्थान

वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह फिरती रुग्णवाहिका पालखी मार्गावर उपलब्ध असणार आहे. दिंडी प्रमुखांचे स्वागत करताना महापालिकेच्या वतीने त्यांना कापडी पिशवी, प्रथमोपचार पेटी, रोप तसेच झाडांच्या बियांचे वाटप करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने सेवासुविधांमध्ये कमतरता राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेऊन यंदाची वारी आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. –शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year 15000 devotees will take darshan of mauli at the same time pune print news ggy 03 ysh
First published on: 09-06-2023 at 11:02 IST