पुणे : कात्रज भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांनी भारतीय पारपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांगलादेशी महिलांसह तिघांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली.
लिझा मकबूल शेख उर्फ खातून तस्लीमा मोफीजूर रेहमान (वय ३०), रिंकी देवी उर्फ खातून तमीना मकबूल मोरल (वय ३८, दाेघी सध्या रा. सिद्धीविनयाक सोसायटी, आंबेगाव बुद्रुक,कात्रज मूळ रा. बांगलादेशी), प्रमो कुमार चौधरी (रा. फतेहपुर,नालंदा बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी पुणे, मुंबई, ठाणे परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी पकडले होते. बांगलादेशी नागरिकांवरिुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आंबेगाव बुद्रुक परिसरात बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती पाेलीस कर्मचारी सागर नारगे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून लिझा आणि रिंकीदेवी राहत असलेल्या सदनिकेत छापा टाकला. पोलिसांनी दोघींची चैौकशी केली. तेव्हा दोघींनी भारतीय पारपत्र दाखविले. पोलिसंनी चौकशी सुरू केली. त्यांच्या घराची तपासणी केली. तेव्हा त्यांच्याकडे बांगलादेशी पारपत्र सापडले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गु्न्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमोले, उपनिरीक्षक युवराज शिंदे, निलेश जमदाडे,सागर नारगे, प्रमोद भोसले, स्वप्नील शर्मा, पूजा खवले यांनी ही कामगिरी केली.
भारतीय पारपत्र मिळवून तीन वेळा बांगलादेशात
लिझा शेखने प्रमोद चौधरीशी विवाह केला आहे. भारतीय पारपत्र काढल्यानंतर ती तीन वेळा बांगलादेशात जाऊन आली होती. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. लिझाचा पती प्रमोदने बिहारमधून लिझा आणि तिची बहीण रिंकी देवी यांचा जन्म दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळविला. त्याआधारे त्याने आधारकार्ड, पॅनकार्ड मिळविले. य कागदपत्रांचा वापर करुन दोघीचे पारपत्र मिळविले,असे पोलिसांनी सांगितले.