पुणे: महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी निघालेल्या तरुणीला ऑनलाइन हाॅटेल बुकिंग करणे महागात पडले. सायबर चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख पाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.

याबाबत एका तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी उच्चशिक्षित आहे. ती नोकरीनिमित्त वाघोली परिसरात स्थायिक झाली आहे. नाताळात तिला महाबळेश्वरला जायचे होते. त्यामुळे तरुणीने ऑनलाइन पद्धतीने हाॅटेलमधील खोली आरक्षित करण्याचे ठरवले होते.

हेही वाचा… पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने; ‘राष्ट्रवादी’चा लोकसभा मतदार संघावर दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीने महाबळेश्वरमधील हाॅटेलची माहिती घेण्यास सुरुवात केली. तिने महाबळेश्वरमधील द कीज हाॅटेलमधील खोली आरक्षित करण्याचे ठरविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हाॅटेलमधील कर्मचारी असल्याची बतावणी करुन चोरट्याने तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये चोरले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.