पुणे : भरदिवसा दिवसा घरात शिरुन चाकूच्या धाकाने दरोडा टाकून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चाकू, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेले सर्व आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. या टोळीने दौंड, बारामती, इंदापूर, सुपा, जेजुरी, शिरूर आणि रांजणगाव परिसरात १९ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहेत.
योगेश उर्फ अटल्या ईश्वर भोसले (वय २४), सचिन ईश्वर भोसले (वय ३९), गहिनीनाथ ईश्वर भोसले (वय २९), मिलन उर्फ मिलिंद ईश्वर भोसले, धोंड्या उर्फ युवराज ईश्वर भोसले, सोन्या ईश्वर भोसले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दौंडमघील बोरीबेल येथे ११ जून रोजी एकाच्या घरात शिरुन चाकूच्या धाकाने दरोड घालण्यात आला होता. दरोडेखोरांनी चाकूच्या धाकाने कपाटातील तीन लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले होते. तसेच तक्रारदाराकडील रोकडही लुटण्यात आली होती. भरदिवसा दरोडा घालण्यात आल्याने दौंड परिसरात घबराट उडली होती. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी तातडीने तपास पथकाला दरोडेखोरांना पकडण्याच्या सूचना तपास पथकाला दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ आणि तपास पथकाने तपास सुरू केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुका परिसरात वास्तव्यास असलेल्या टोळीने दरोडा घातल्याची माहिती तपासात मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दरोडेखोरांना पकडले. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, बारामती विभागाचे अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि पथकाने ही कामगिरी केली.
कुटुंबात २८ सदस्य; बहुतांश गुन्हेगार
दौंडमध्ये भरदिवसा दरोडा घालण्यात आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण होते. कर्जत तालुक्यातील ईश्वर भोसले टोळीने दरोडा घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पसार आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले होते. पोलिसांनी अटक केलेले पाच जण भाऊ आहेत. त्यांच्या कुटूंबात २८ सदस्य आहेत. यातील बहुतांश सदस्य गुन्हेगार आहेत. आरोपींनी पुणे ग्रामीणसह सोलापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बुलढाणा, बीड अशा जिल्ह्यांमध्ये सुमारे भरदिवसा घरफोड्यांचे ६० गुन्हे केल्याचे उघड झाले आहेत.