पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. राज्यातील ८७.९६ लाख शेतकरी पात्र असून, दोन्ही योजनेचे सुमारे १९४३.४६ कोटी रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. खरीप, रब्बी हंगामात पेरणी, मशागत, खते आणि शेतमजुरांना मजुरी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा निधी ऐन उन्हाळ्यात मिळत आहे.
राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान) डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीतील १६ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, बुधवारी यवतमाळ येथील कार्यक्रमात वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत प्रति शेतकरी दोन हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून चार हजार, असे एकूण सहा हजार रुपयांचा लाभ राज्यातील सुमारे ८८ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होणार आहे.
हेही वाचा…पुणे : स्वदेशी ‘जीएमआरटी’चा ३८ देशातील शास्त्रज्ञांकडून वापर
राज्यात २०२३-२४ पासून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील ८५.६० लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी १७१२ कोटी रुपये यापूर्वी अदा केले आहेत. २०२३-२४ मधील उर्वरीत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रितरित्या आज, बुधवारी दिला जाणार असून, त्यापोटी ३८०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. केंद्र सरकारने आज, २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा…धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
२७६३८ कोटी रुपये जमा
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे. हंगामात खर्चासाठी पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली. योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार प्रती हप्ता याप्रमाणे वर्षांत तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येतात. या योजनेअंतर्गत २४ फेब्रुवारी २०२४ अखेर राज्यातील ११३.६० लाख शेतकरी कुटुंबांना एकूण १५ हप्त्यांमध्ये २७६३८ कोटींचा निधी जमा झाला आहे.