भाजप आठ जागा राखणार का, याची उत्सुकता
विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (२४ ऑक्टोबर) जाहीर होत असून सत्ताधारी भाजपला निवडणुकीत किती जागा मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र शहरातील काही मतदार संघांत अनपेक्षित निकाल लागतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजप आठ जागा राखणार का, याबाबत उत्सुकता आहे.
वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आप, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम या पक्षांचे मिळून एकूण १०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.मतमोजणी गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून दुपारी चापर्यंत निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र भाजप सन २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे आठही जागा राखणार का, याचीच उत्सुकता आहे.
कुठे सरळ लढत, कुठे भाजपविरोधकांना बळ..
कसबा पेठ
भाजपच्या मुक्ता टिळक, काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि मनसेचे अजय शिंदे यांच्यात या मतदार संघात लढत होणार आहे. मनसेला मानणारा वर्ग या मतदार संघात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे हे टिळक यांना आव्हान देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे हे रिंगणात असल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
कोथरूड
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड विधानसभा मतदार संघातील लढत भाजप व मनसे अशी सरळ होणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या आखाडय़ात उतरलेले पाटील या मतदार संघातून लढणार असल्यामुळे त्यांना पराभूत करण्यासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना भाजपविरोधी पक्षांनी बळ दिले आहे.
शिवाजीनगर
भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांच्यापुढे काँग्रेसचे दत्तात्रय बहिरट आणि मनसेचे सुहास निम्हण यांचे आव्हान असेल. भाजपचा हा पारंपरिक मतदार संघ असला, तरी काँग्रेसलाही मानणारा वर्ग येथे आहे. मनसेच्या उमेदवाराकडूनही कडव्या लढतीची अपेक्षा आहे. त्यामुळे शिवाजीनगरमधील लढत तिरंगी होणार आहे.
पर्वती
भाजपच्या शहराध्यक्ष, विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या अश्विनी कदम यांच्यात ही लढत होणार आहे. आठही मतदार संघांपैकी याच मतदार संघात दोन महिलांमध्ये लढत होणार आहे. माधुरी मिसाळ या दोन वेळा या मतदार संघातून निवडून आल्या आहेत. त्यामुळे अश्विनी कदम त्यांना कसे आव्हान देणार, याबाबत उत्सुकता आहे.
खडकवासला
भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्यापुढे खडकवासल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांचे आव्हान आहे. भीमराव तापकीर दोन वेळा या मतदार संघातून विजयी झाले आहेत, तर सचिन दोडके प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तापकीर-दोडके अशी सरळ लढत येथे होणार आहे.
वडगांव शेरी
भाजपचे आमदार जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे अशी लढत वडगांव शेरी मतदार संघात होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हे दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात उभे होते. शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराने माघार घेतली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात भाजपपुढे जागा राखण्याचे आव्हान असणार आहे.
हडपसर
भाजपचे उमेदवार, विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांचे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत हे तिन्ही उमेदवार एकमेकांविरोधात लढले होते. राष्ट्रवादी-भाजप अशी लढत होण्याची शक्यता असली, तरी मनसेकडूनही आव्हान दिले जाईल.
पुणे कॅन्टोन्मेंट
भाजपचे उमेदवार सुनील कांबळे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यात ही लढत होणार आहे. मनसेच्या मनीषा सरोदे यांचे त्यांना आव्हान असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने बागवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.