इंदापूर:उजनी धरणातील पाणी पातळी खालावल्याने इनामदारांचा वाडा,प्राचीन पळसनाथ मंदीर,डिकसळचा ब्रिटिशकालीन पुल पाण्याबाहेर आला असून प्राचीन अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची पावले उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडे वळू लागली आहेत. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असलेल्या व सध्या उजनी जलाशयाची पाणी पातळी खालावल्याने कुगाव येथील इनामदार वाडा, पळसदेव येथील पळसनाथाचे प्राचीन मंदिर, ब्रिटिशकालीन डिकसळ चा पुल पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत.
गतवर्षी सुद्धा हे अवशेष पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. पाणीसाठा कमी झाल्याने या प्राचीन स्थापत्य कलेचा अनुभव नागरिकांना घेता आला. त्यानंतर पडलेल्या मुबलक पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आणि पुन्हा हे सर्व अवशेष पाण्याखाली गेले.सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कुगाव येथील इनामदार वाडा, पळसदेव येथील पळसनाथाच्या मंदिर पाण्याबाहेर आले आहे.तर ब्रिटिश कालीन डिकसळ चा पूल पाण्याबाहेर उघडा पडला आहे.
उजनी धरणाच्या बांधणी नंतर जुन्या पळसदेव गावाला जलसमाधी मिळाली होती. भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये अनेक प्राचीन काळातील गावे वसलेली असल्याने त्या गावच्या ऐतिहासिक पाऊलखुणा आजही दिमाखदार,व वैभवशाली परंपरेची साक्ष ठरतात.
चारशे वर्षांपूर्वीचा इनामदार वाडा पाण्याबाहेर दिसू लागला आहे. सैराट चित्रपटाचे चित्रीकरण येथे झाल्यानंतर हा वाडा आणखीनच प्रकाश झोतात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांना सरहद्दीवरील शत्रूंचा बंदोबस्त करण्याची कामगिरी मालोजीराजेंवर सोपविली.भीमा नदी काठाच्या कुगाव या ठिकाणी सैन्यांना रसद मिळण्यासाठी मदत व्हावी म्हणून किल्ला बांधला. सध्या हा किल्ला उजनी परिसरातील पाणी कमी झाल्याने उघडा पडू लागला आहे. फक्त उन्हाळ्यातच हा किल्ला उघडा पडत असल्यामुळे शिवप्रेमी नागरिक, पर्यटक हा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने इकडे येत आहेत.सैराट मुळे किल्ला पर्यटकासमोर आला आहे. नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटातील काही प्रसंग या वाड्यावर चित्रित केले होते. त्यामुळे हा किल्ला पर्यटका समोर येऊन आता तिथे गर्दी होऊ लागली आहे.
डिकसळ चा पूल उघडा.
ब्रिटिश काळातील इंदापूर व करमाळा तालुक्याच्या सीमेवर असलेला ब्रिटिशकालीन डिकसळचा पूल भीमा नदीपात्रातून पूर्णपणे उघडा पडला आहे.
तब्बल एकशे पासष्ट वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेल्या डिकसळच्या पुलावरून दक्षिणोत्तर राज्यांना दळणवळणाच्या सोयीच्या दृष्टीने जोडणारा रेल्वे मार्ग होता. ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचे देखणे रूप नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने पर्यटक व प्रवाशांना आकर्षित करत आहे.
होडीतून पाहण्याचा आनंद
उजनी धरण पाणलोट क्षेत्रामुळे परिसरातील गत वैभव असलेल्या वास्तु लुप्त झाल्या आहेत. मात्र धरणाची पाणी पातळी कमी होताच पुरातन मंदिरे, वाडे,रस्ते,पुल पाण्याबाहेर पडू लागताच त्या वास्तु पाहण्यासाठी पुण्या, मुंबई सह विविध ठिकाणाहून पर्यटक गर्दी करू लागले आहेत. ते होडीतून पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
उजनी धरण परिसरात अद्याप पर्यटन क्षेत्र विकसित न झाल्याने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना राहण्याची खाण्यापिण्याची सोय करता येत नाही उजनी धरण परिसरात असलेल्या टेंभुर्णी,भिगवण, इंदापूर करमाळा या ठिकाणी निवासाची व्यवस्था करावी लागते. पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने उजनी पाणलोट क्षेत्रात पर्यटन केंद्र लवकर विकसित होणे गरजेचे बनले आहे.