स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) विरोधात व्यापारी संघटनांनी बुधवारपासून पुन्हा एकदा बेमुदत बंदला सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यापारी व शासन यांच्यातील संघर्षांत पुन्हा एकदा पुणेकरांना बंदचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. शहरात बुधवारी काही प्रमाणात दुकाने सुरू होती. मात्र, गुरुवारपासून कडकडीत बंद पाळला जाईल, असा दावा पुणे व्यापारी महासंघाने केला आहे.
एलबीटीच्या विरोधात ८ मे पासून राज्यव्यापी बेमुदत बंद सुरू करण्याची घोषणा गेल्या महिन्यातच करण्यात आली होती. त्यानुसार या राज्यव्यापी बंदमध्ये पुण्यातील घाऊक बाजारपेठांमधील व्यवहार बुधवारी पूर्णत: बंद राहिले. किरकोळ व्यापारीही बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अनेक भागातील किरकोळ दुकाने बुधवारी दुपारनंतर उघडी होती. शहरातील काही दुकाने बुधवारी उघडी होती. मात्र, गुरुवारी सर्व व्यावसायिक बंदमध्ये सहभागी होतील, असे सांगण्यात आले.
एलबीटीतील जाचक अटी रद्द करण्याबाबत दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळलेला नाही आणि फोडा व राज्य करा या नीतीने मुख्यमंत्री काम करत आहेत. त्याबरोबरच चुकीची माहिती देऊन ते आंदोलनाबाबत दिशाभूलही करत आहेत, असे आरोप व्यापारी महासंघातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक तसेच फत्तेचंद रांका यावेळी उपस्थित होते. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे नागरिक वेठीस धरले गेलेले नाहीत, तर सरकारच्या धोरणामुळे नागरिक वेठीला धरले जात आहेत, असाही दावा यावेळी करण्यात आला. एलबीटीबाबत जनजागृती करण्याची मोहीम व्यापारी संघटनांतर्फे गुरुवारी (९ मे) शहरातील प्रमुख चौकांमध्ये राबवली जाणार आहे.
पिंपरीत संमिश्र प्रतिसाद
एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला िपपरी-चिंचवड शहरात पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला. पिंपरी बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार बंद होते. तथापि, गावठाण व अंतर्गत भागातील व्यवहार सुरूच असल्याचे दिसून आले. मॉलला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते.
राज्य शासनाने लागू केलेल्या एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत बंद सुरू केला आहे. व्यापाऱ्यांचा प्रभाव असलेल्या िपपरी बाजारपेठेतील व्यवहार बुधवारी सुरूच झाले नाहीत. त्यामुळे या भागात बंदचे वातावरण दिसून येत होते. पिंपरी वगळता शहरातील अन्य भागात, गावठाणांमध्ये ठिकठिकाणी व्यवहार सुरूच होते. महामार्गावरील मोठी दुकाने वगळता अन्य व्यावसायिक बंदमध्ये सहभागी झाले नाहीत. हॉटेल व पेट्रोलपंप सुरू होते.
पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिंपरी बाजारपेठेत पोलीस निरीक्षक मोहन विधाते सकाळपासूनच तळ ठोकून होते. दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे उमप यांनी सांगितले. ते म्हणाले की, व्यापाऱ्यांचा बंद शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रमुख नेते व आंदोलक मिळून १२३ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आंदोलन, रॅली आदींना परवानगी न देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मॉलचालकांची बैठक घेऊन मॉल सुरू ठेवण्याची विनंती केली होती. त्यांना बंदोबस्ताची हमी दिल्यानंतर मॉल सुरू राहिले. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित झाल्याने गेल्यावेळेप्रमाणे या वेळी नागरिकांचे हाल झाले नाहीत.
व्यापाऱ्यांची मागणी बदलली
एलबीटीमधील जाचक अटी रद्द झाल्या पाहिजेत, या करातील त्रुटी दूर झाल्या पाहिजेत, अशी व्यापारी संघटनांची मुख्य मागणी होती. त्यासाठी आतापर्यंत आंदोलने करण्यात आली. मात्र, या मागणीत व्यापारी संघटनांतर्फे पूर्णत: बदल करण्यात आला असून आता एलबीटीच नको, एलबीटी पूर्णत: रद्द झाला पाहिजे अशी नवी मागणी सुरू करण्यात आली आहे.