डेक्कन जिमखाना भागातील वाहतुकीला अडथळे
पुणे : डेक्कन जिमखाना भागातील गोखले स्मारक चौकात महापालिकेकडून गेल्या काही दिवसांसासून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. अत्यंत गजबजलेल्या गोखले स्मारक चौकात हे काम सुरू असल्याने या भागातील वाहतुकीचा बोजवारा उडाला असून वाहतुकीचा वेगही कमालीचा संथ झाला आहे.
गेल्या आठवडाभरापासून गोखले स्मारक चौकात महापालिकेकडून जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून आणखी महिनाभर हे काम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खंडुजीबाबा चौकातून फग्र्युसन रस्ता, भांडारकर रस्ता तसेच आपटे रस्त्याकडे जाणारी वाहने गोखले स्मारक चौकातून मार्गस्थ होतात. या भागात वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणावर असते. गरवारे उड्डाणपूल उतरल्यानंतर काही अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपापासून खोदाई सुरू करण्यात आली आहे. हे काम दिवसा केले जात असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी या भागात मोठी कोंडी होत असून वाहनांची रांग खंडुजीबाबा चौकापर्यंत जाते. त्यामुळे या भागातून जाणारे वाहनचालक कोंडीतून मार्ग काढताना मेटाकुटीला येतात.
रस्ते खोदाईमुळे पादचाऱ्यांना या भागातून चालणे अवघड झाले असून ज्येष्ठ नागरिकांचीही गैरसोय होत आहे. या भागातील स्थानिक रहिवासी तसेच व्यावसायिकांनी दिवसा सुरू असलेल्या कामामुळे नाराजी व्यक्त केली.
रस्त्याच्या कडेला पडणारा राडारोडा वाहून नेणारी वाहने गर्दीच्या वेळी रस्त्यात थांबतात. त्यामुळे कोंडीत भर पडते, अशी तक्रार या भागातील रहिवाशांनी केली. फग्र्युसन रस्त्यावरील ज्ञानेश्वर पादुका चौकापासून पुढे म्हसोबा गेट चौकापर्यंत पदपथाचे काम सुरू आहे. पदपथाचे काम सुरू असल्याने फग्र्युसन रस्त्यावरील ललित महल हॉटेल चौक ते म्हसोबा गेट (कृषी महाविद्यालय चौक) दरम्यान वाहतूक विस्कळीत होत आहे.
नाताळसाठी फग्र्युसन रस्त्यावर गर्दी; अतिक्रमणांकडे काणाडोळा
नाताळ सणामुळे फग्र्युसन रस्त्यावर गर्दी सुरू झाली आहे. फग्र्युसन रस्त्यावरील पदपथांवर बेकायदा पथारी व्यावसायिकांकडून कपडे, पादत्राणे आदींची विक्री करण्यात येते. बेकायदा व्यवसाय करणाऱ्या टपरी व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे पदपथावरून चालणे देखील अवघड झाले आहे. नाताळनंतर नववर्षांपर्यंत फग्र्युसन रस्त्यावर मोठी गर्दी होते. या भागातील अतिक्रमणांकडे महापालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कोंडीत भर पडते तसेच पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होते.
डेक्कन जिमखाना भागातील गोखले स्मारक चौकात जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. वाहनचालकांची गैरसोय होत असतान या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत.
– किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक, डेक्कन वाहतूक विभाग