बारामती : शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा विचार करून बारामतीत वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १५३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एक लाख ५८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

ही मोहीम २७ जुलै ते ९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आली. तपासणी दरम्यान नियमभंग करणारी अनेक वाहने आढळली. त्यापैकी काही अवजड वाहने ही ताब्यात घेऊन वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. परवाना जवळ नसणे, नो-एन्ट्री झोनमध्ये प्रवेश करणे, वाहन धोकादायक पद्धतीने चालविणे, वाहन विमा नसणे, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसणे, फॅन्सी नंबरप्लेट लावणे आदी नियमभंग करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली.

‘वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक वाहन चालकाचे कर्तव्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहनचालकांनी कागदपत्रे जवळ ठेवावी. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, बारामती.