पुणे : वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने बेकायदा हुक्का पार्लर चालविणाऱ्या एका हाॅटेलचालकाकडून कारवाई न करण्यासाठी दरमहा २० हजार रुपये हप्त्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक विशाल पवार याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पाेलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले आहेत.

शहरातील बेकायदा धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. कोंढव्यातील एका हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू होते. त्यावर पोलिसांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी छापा टाकला होता. हाॅटेलमालकाचा मोबाइल तपासला असता वानवडी पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक विशाल पवारचा मोबाइल क्रमांक आढळून आला. दोघे एकमेकांच्या संपर्कात होते.

पवार याला १ डिसेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्याला एक वर्षासाठी प्रशिक्षणासाठी पाठविले होते. पवारने हाॅटेलमालकाला हुक्का पार्लरवर कारवाई होणार असल्याचा संदेश पाठविला होता. चौकशीत हॉटेलमालकाने पवार याला दरमहा हप्ता देत (प्रोटेक्शन मनी) असल्याचे सांगितले. त्यानंतर पवार याची चौकशी करण्यात आली. त्याचे वर्तन शिस्तीला बाधा पोहोचविणारे असून, पोलीस खात्याचे प्रतिमा मलीन करणारे असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर पवार याला पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हप्तेखोरी प्रकरणात यापूर्वी एक पोलीस निलंबित

संबंधित हाॅटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू ठेवण्यासाठी हाॅटेलचालकाकडून दरमहा सहा हजार रुपये हप्ता घेणारा पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र राजाराम पवार याला निलंबित करण्यात आले होते. पवार वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस होता. हाॅटेलचालकाकडून तो हप्ता घेत असल्याचे उघडकीस आल्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी त्याला निलंबित केले होते. २६ डिसेंबर रोजी पोलिसांनी या हाॅटेलमधील हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली होती. तेथून हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला होता.