पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत हडपसर स्थानकाची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. तांत्रिक सुविधांची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी (२० जुलै) या स्थानकावरील गाड्यांचे वेळापत्रक रद्द करून उपनगरीय रेल्वे (लोकल) सेवा बंद ठेवण्यात आली, तर लांब पल्ल्याच्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्या अनुक्रमे दौंड आणि पुणे स्थानकावरून सोडण्यात आल्या. या गाड्यांना स्थानकावरून नियोजित ठिकाणी जाण्यासाठी सुमारे दोन तास विलंबाने सोडण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना आणि मालवाहतुकीला याचा फटका बसला.
पुणे रेल्वे स्थानकावरील गाड्यांचा ताण कमी करण्यासाठी खडकी आणि हडपस स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात खडकी स्थानकातील दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. त्यामुळे दोन दिवस स्थानकावरील गाड्या विलंबाने सोडण्यात येत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांना फटका बसला होता. या स्थानकावरील दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत हडपसर रेल्वे स्थानकातील तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या स्थानकावरून उपनगरीय दौंड-पुणे (लोकल) या १७ गाड्यांची सेवा दिवसभर बंद ठेवण्यात आली. रविवार असल्याने उपनगरीय सेवेवर फारसा परिणाम झाला नसला, तरी लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले.
यामध्ये काजीपेठ-हडपसर एक्सप्रेस, जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, सोलापूर-पुणे (डेमू), हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या गाड्या दौंड आणि पुणे स्थानकावरच थांबविण्यात आल्या. तर पुन्हा माघारी जाताना वेळापत्रकात आणि स्थानकात बदल करून विलंबाने सोडण्यात आल्या. विशेषत: चेन्नई एक्सप्रेस, तिरूअनंतपुरम एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस या गाड्या अर्ध्या तासापासून ते दोन तास विलंबाने धावल्या. हमसफर एक्सप्रेस, इंदूर एक्सप्रेस, अमरावती-पुणे एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते तीन तास विलंबाने धावल्या.
परिणामी याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला. विशेषत: दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांना दौंड स्थानकापर्यंत जावे लागले. हडपसर स्थानकापर्यंत असणारी गाडी पुणे स्थानकावर थांबविण्यात आल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर नियोजित ठिकाणी जाण्यासाठी त्रास झाला.
हडपसर रेल्वे स्थानकावरील दुरुस्तीसाठी एक दिवस थांबा घेण्यात आला होता. आजपासून सेवा पूर्ववत करण्यात येणार असून, वेळापत्रकानुसार रेल्वे धावतील. प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल खेद आहे.- हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग