पुणे : देशातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी मे ते जूनपर्यंत या युद्धनौकेवर लढाऊ विमाने तैनात करण्यात येतील, असे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांनी बुधवारी सांगितले. नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी सरकारचे पाठबळ मिळत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४३ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलन सोहळय़ानंतर नौदलप्रमुखांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हरी कुमार म्हणाले, ‘आयएनएस विक्रांत’ युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यावर त्याच्या समुद्री चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्यांना सुरुवात झाली आहे. लढाऊ विमाने उतरविण्याची प्रणाली (लँडिंग सिस्टीम) तपासावी लागणार असून त्या संदर्भातील चाचण्या सुरू आहेत. सर्वसाधारणपणे अशा चाचण्यांसाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. पुढील वर्षांतील जूनपर्यंत या चाचण्या पूर्ण होतील. नौदलाने स्वयंपूर्णतेवर भर दिला असून, त्यात आधुनिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नौदलात १९६० मध्ये पहिली स्वदेशी बनावटीची छोटी नौका दाखल झाली. तेव्हापासून   विनाशिका, विमानवाहू युद्धनौकांची देशांतर्गत बांधणी करत आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.

‘एनडीए’मध्ये महिला छात्रांना प्रवेश देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. ‘सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. नौदलाने महिला खलाशांना सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत खलाशांची तीन हजार रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी दहा लाख अर्ज आले आहेत. त्यापैकी ८२ हजार अर्ज महिलांचे आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– आर. हरी कुमार, नौदलप्रमुख